राज्यातील शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करा – अजित पवार यांची सभागृहात मागणी

05 Mar 2018 , 06:12:16 PM

- अभिमान गीताच्या पत्रकातून सातवं कडवं गायब ...दादांनी व्यक्त केली नाराजी...

आज विधान सभेत मराठी भाषा दिन साजरा करत असताना गाण्यात येत असलेल्या मराठी अभिमान गीतातून सातवे कडवे वगळण्यात आले होते. ही बाब विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तर अभिमान गीत सुरु असतानाच माईक बंद पडल्याची बाब लक्षात आणून देतानाच अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे कोणी मुद्दाम करत आहे का? हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले होते आणि त्यातून कोणाला काय मिळतंय याची चौकशी करा अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली.

अजित पवार यांनी राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करा. कारण काही मुलांना मराठी नीट वाचता किंवा लिहिता येत नाही. मला कुणाचा अपमान करायचा नाही परंतु सभागृहातील काही सदस्यांनाही मराठी नीट येत नाही याबाबत नाराजी व्यक्त करतानाच मराठी भाषा टिकण्यासाठी हा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे ते म्हणाले. हा निर्णय घेतला तरच मराठी भाषा टिकेल असेही अजित पवार म्हणाले.

मराठी भाषा विषयक ठरावावर बोलताना अजित पवार यांनी ही मागणी लावून धरली. दरम्यान मराठी भाषा विषयक ठराव मांडत असतानाच विनोद तावडे यांचे सभागृहामध्ये आगमन झाले, त्यांच्या उशीरा येण्यावरही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार जयंत पाटील यांचा सवाल

विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी देणार हा मुद्दा सभागृहामध्ये लावून धरला मात्र त्यावर योग्य ते उत्तर न मिळाल्याने सभागृहात गोंधळ झाला व त्यामुळे सभागृह काही काळासाठी तहकूब करण्यात आले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याची जबाबदारी शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडे होती. त्या कामाची सध्या स्थिती काय आहे? दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय कधीपर्यंत घेणार असा सवाल गटनेते जयंत पाटील यांनी सभागृहात केला. मात्र त्याचे उत्तर समाधानकारक देण्यात आले नाही त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. विरोधीपक्षांनी वेलमध्ये उतरत आंदोलन केले. त्यामुळे काही काळासाठी सभागृह तहकूब करण्यात आले.

संबंधित लेख