पेट्रोल-डिझेलवर कर लावून भाजप सरकार आपल्या तुंबड्या भरते आहे - जयंत पाटील

24 May 2018 , 11:51:44 PM

केंद्र सरकार आणि राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर कर लावून आपल्या तुंबड्या भरत आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला लुटण्याचे काम भाजप करते आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

पेट्रोल आणि डिझेलवर लावलेल्या करामुळे महागाई वाढली आहे. जगाच्या पाठीवर सर्वात महाग पेट्रोल आमच्या देशात आणि देशातील सर्वात महाग पेट्रोल आमच्या राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर लावण्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर वाढले तर आपण समजू शकतो, परंतु महाराष्ट्राचा कर, वॅट आणि केंद्र सरकारचा अबकारी कर यांची एवढी मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या पैशातून देश चालवायचा प्रसंग भाजप सरकारवर आलेला आहे का असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

आपले स्वत:चे कर कमी करण्याची संधी असतानाही राज्य सरकार कर कमी करत नाही. व्हॅल्यू अॅडेड टॅक्स कमी केला तर थोडासा दिलासा महाराष्ट्रातील ग्राहकांना मिळेल. केंद्र सरकार पेट्रोलवर जी काही एक्साईज ड्यूटी घेत असेल ती कमी करावी. त्यामुळे देशभर पेट्रोल-डिझेलची परिस्थिती सुधारेल नाहीतर पाकिस्तानचं पेट्रोल आपल्यापेक्षा स्वस्त आहे. अफगाणिस्तानचं, श्रीलंकेचं आणि बांग्लादेशमध्ये पेट्रोल आपल्यापेक्षा स्वस्त आहे. मग भारताने भाजपला मत देऊन का घोडचूक केली? असा प्रश्न सामान्य जनता आज विचारत आहे, असेही ते म्हणाले.

संबंधित लेख