सरकारकडून ऊसतोड कामगारांची फसवणूक आणि स्व. मुंडे साहेबांचा अवमान - धनंजय मुंडे

12 Jun 2018 , 12:02:29 AM

स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची केवळ घोषणा करून ते सुरुवात करण्याआधीच गुंडाळणे हा केवळ राज्यातील लाखो ऊसतोड कामगारांचाच नव्हे तर स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचाही सरकारने अवमान केला आहे. ही कामगारांची फसवणूक आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपला संताप व्यक्त केला.

साधारण साडेतीन वर्षांपूर्वी सरकारने स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावे ऊसतोड कामगार महामंडळ सुरू करण्याची व त्याचे कार्यालय परळी येथे सुरू करण्याची घोषणा केली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ रोजी पांगरी येथील स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळी त्यांच्या जयंतीदिनी ही घोषणा केली होती. मात्र तीन वर्ष महामंडळ स्थापन करण्याबाबत काहीच कारवाई केली नाही. धनंजय मुंडे यांनी वारंवार हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. नुकत्याच झालेल्या मार्च अधिवेशनातही त्यांनी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले होते. तेव्हा कामगारमंत्री संभाजी पाटील यांनी एक महिन्याच्या आत हे महामंडळ व कार्यालय सुरू करू असे आश्वासन दिले होते. मात्र तीन महिने होऊनही त्यावर काहीच कारवाई झाली नाही. उलट आता हे महामंडळच सुरू होण्याआधी गुंडाळण्याचे सरकारने ठरवले आहे. ज्या स्व. मुंडे साहेब यांनी भाजपाची उभारणी केली पक्षाला सत्ता मिळवून दिली त्यांच्या प्रेमाखातर लाखो ऊसतोड कामगारांनी सातत्याने भाजपला साथ दिली त्या सर्वांचा सरकारने विश्वासघात आणि फसवणूक केल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख