राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे 'गाव, प्रभाग तेथे राष्ट्रवादी' अभियान २७ जुलैपासून

27th July 2017

महाराष्ट्र

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (२२ जुलै) राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे 'गाव तेथे राष्ट्रवादी' या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सुमारे ५००० सक्रिय शाखा सुरु होणार आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना संग्राम कोते पाटील यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण राज्यात विद्यार्थी संघटनेच्या सुमारे ८०० शाखांचे उद्घाटन करून नवीन कार्यकर्ते पक्षात सक्रिय केले होते. त्याच धर्तीवर अजित दादांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होताना पाहणे हे महाराष्ट्रातील तमाम युवकांचे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुढे सरसावली आहे.

या ५००० शाखांमधून जवळजवळ अडीच ते तीन लाख युवा कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत जोडले जाणार आहेत. दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतून हजारो कार्यकर्ते तयार करणारे संग्राम कोते पाटील येणाऱ्या काळात निश्चितच लाखो युवकांची फौज तयार करतील, असा विश्वास पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना आहे.

हे अभियान २७ जुलैपासून सुरू होत असून दररोज २५ शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास १०० दिवसांचा दौरा युवक प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते पाटील करणार असून या अभियानात राज्यातील तमाम युवकांनी युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गावागावातून युवकसंघटनेच्या शाखा काढून सक्रिय व्हावे आणि या शाखांमार्फत युवकांच्या तसेच समाजातील विविध प्रश्नांवर आक्रमक आणि विधायक काम करून पक्ष संघटना वाढवावी, असे आवाहन संग्राम कोते पाटील यांनी केले आहे.