राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी आक्रमक विद्यार्थ्यांसाठी राबवणार कोविड शिक्षण शुल्कनीती अभियान

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी आक्रमक
विद्यार्थ्यांसाठी राबवणार कोविड शिक्षण शुल्कनीती अभियान

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद आहेत. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी काही ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र, काही ठिकाणी शाळा, महाविद्यालये पालकांकडून अधिकचे शैक्षणिक शुल्क सक्तीने आकारण्यात येत आहे, तर काहींनी पालक आणि विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावला आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी कोविड शिक्षण शुल्कनीती अभियान ही मोहीम राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्या परिस्थितीत शाळा, महाविद्यालये,क्लासेस यांनी शुल्क निश्चिती आणि शुल्क आकारणीबाबत निश्चित धोरण ठरवणे गरजेचे आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी मांडली आहे.

अशी असेल शुल्कनीती
१. शासनाने सूचित केल्याप्रमाणे कोणत्याही शैक्षणिक संस्थेने शुल्कवाढ करू नये.
२. पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करून शैक्षणिक संस्थांनी शक्य असेल तेवढे शुल्क कमी करावे.
३. निश्चित केलेले शुल्क टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी आराखडा आखावा व त्यानुसार अंमलबजावणी करावी.
४. कोणत्याही परिस्थितीत पालक किंवा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये. त्याचबरोबर केवळ शुल्क न भरल्याचे कारण दाखवत कोणत्याही विद्यार्थ्यांला कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित ठेवू नये.
वरील शुल्कनीतीची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सर्व विभागांचे नवनिर्वाचित विभागीय प्रमुख तसेच सर्व जिल्हा, शहर, तालुका अध्यक्ष व पदाधिकारी शाळा, महाविद्यालये व क्लासेस यांना प्रत्यक्ष भेट देऊन शिक्षण शुल्कनीती समजावून सांगणार आहेत. विद्यार्थ्यांना वा पालकांना शैक्षणिक संस्थांकडून नाहक त्रास झाल्यास विद्यार्थी काँग्रेस त्या त्या भागातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेईल, अशी भूमिकाही प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी मांडली आहे.