विधानसभेत विरोधकांचा गदारोळ, सिडको जमीन घोटाळ्यावर चर्चेची मागणी

05 Jul 2018 , 07:21:17 PM

पावसाळी आधिवेशनच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सिडको जमीन घोटाळ्यावर चर्चेची मागणी केली. सभागृहात प्रवेश करताना विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले तसेच सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतरही एक सुरात प्रश्नोत्तराचा तास रद्द करून सिडकोच्या जमीन घोटाळ्यावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. सिडको जमीन प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे नाव समोर येत असल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा विषय सभागृहात मांडत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री सरकारच्या तिजोरीवर दरोडा घालत आहेत, जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय असून यावर बोलू देण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन मुख्यमंत्री आणि सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. गोंधळाच्या वातावरणात सभागृहाचे कामकाज वेळोवेळी तहकूब होऊन अखेर दिवसभरासाठी विधानसभा तहकूब करण्यात आली. मात्र, विरोधकांच्या या रणनितीवरून हे अधिवेशन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारसाठी अडचणीचे ठरणार असल्याचे स्पष्ट होते आहे. 

संबंधित लेख