भाववाढीचे गाजर दाखवून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे - अजित पवार

05 Jul 2018 , 10:45:39 PM

शेतमालाला आधी जाहीर केलेले भाव न देता फक्त निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाववाढीचे गाजर दाखवायचे, ही शेतकऱ्यांची धादांत फसवणूक आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी विधानसभा दणाणून सोडली. तत्पूर्वी शेतकऱ्यांच्या विवध मागण्यांसाठी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना अजितदादांनी सरकारच्या कारभारावर जोरदार प्रहार केला. 

सरकार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून विविध पिकांचे उत्पादन करून घेते, परंतु त्याची खरेदी केली जात नाही. तूरीची खरेदी आजवर हे सरकार करू शकले नाही. त्यामुळे निवडणुकीतील मतांवर डोळा ठेवून सरकारने हमीभाव जाहीर केले असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला. चार वर्षांपूर्वी खर्चाच्या दीडपट आधारभूत किंमत देऊ, असे सरकारतर्फे सांगण्यात आले आणि ही रक्कम दिली असल्याचे आता सांगण्यात येत आहे. मात्र ही जनतेची फसवणूक आहे, ही आकडेवारी फसवी आहे. आधारभूत किंमत देण्याचा स्वामीनाथन आयोगाचा फॉर्मुला सरकारने बासनात गुंडाळून ठेवला, अशी जळजळीत टीका पवार यांनी केली. 
   
वास्तविक मंडळ हा गाभा धरुन पीक विम्याची रक्कम द्यायला हवी, परंतु सरकारने तालुकावार विभागणी केली आहे, त्यामुळे आमचा शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिला आहे. पीक विम्याच्या बाबतीत पीक विमा कंपन्यांना गब्बर करण्याचे आणि शेतकऱ्याला कंगाल करण्याचे काम भाजप-शिवसेना सरकारने केले असून विधानसभेत चर्चेदरम्यान त्यांचे कटकारस्थान आम्ही समोर आणू, असा इशारा पवार यांनी दिला.  

संबंधित लेख