विरोधी नेत्यांचे राजीनामे मागणे ही सत्ताधाऱ्यांची कृती लोकशाहीविरोधी – अजित पवार

09 Jul 2018 , 07:20:17 PM

सत्ताधारी चुकत असतील तर त्यांना जाब विचारण्याचा आणि राजीनामा मागण्याचा अधिकार विरोधी पक्षांना असतो, परंतु सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राजीनाम्याची मागणी केल्यानंतर सत्ताधारी आणि खुद्द सभागृहप्रमुखच विरोधी पक्षानेत्यांचा राजीनामा मागत आहेत ही बाब लोकशाहीविरोधी आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

सिडकोच्या जमीन भ्रष्टाचाराचा मुद्दा सभागृहामध्ये आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली त्यावरुन सभागृह काही काळासाठी तहकुबही करण्यात आले. मात्र सत्ताधारी पक्षाच्या लोकांनीच गोंधळ घालत विरोधी नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने सभागृह दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. त्यानंतर अजितदादा यांनी पत्रकारांशी बोलताना सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला.

विरोधकांनी कुठला प्रश्न विचारुच नये आणि प्रश्न विचारला तर तुम्हीच राजीनामा द्या अशा पद्धतीची लोकशाहीविरोधी कृती सत्ताधाऱ्यांकडून केली जाते हे फार चुकीचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अशाप्रकारचे पायंडे पडायला लागले किंवा अशाप्रकारच्या मागण्या व्हायला लागल्या तर ते चुकीचे ठरेल. सुधाकरराव नाईक, शरद पवार साहेब, नारायण राणे, मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, विलासराव देशमुख या माजी मुख्यमंत्र्यांपैकी कुणीही कधीही अशाप्रकारची मागणी केलेली नाही. सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे. विरोधी पक्षाला घटनेने, कायद्याने, विधिमंडळाने काही अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करुन काम चालतं, त्यामुळे सत्ताधाऱ्यांची ही मागणी रास्त नसल्याचे ते म्हणाले.

संबंधित लेख