मनोहर भिडे यांच्या वक्तव्याचा अजित पवार यांनी केला निषेध

09 Jul 2018 , 07:33:53 PM

समाजातील दोन ते तीन टक्के लोकच चांगली आहेत, असा विचार सांगणारा मनु हा संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे मनोहर भिडे यांचे वक्तव्य खेदजनक असल्याचे मत विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. मनुचे विचार योग्य नसल्याचे महात्मा फुले यांनी सांगितले, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीची प्रत फाडून टाकली होती. ही मनुस्मृती आपल्या बहुजन समाजाला, मागासवर्गीय, ओबीसी समाजाला पुढे घेऊन जाणारी नाही, हे आपल्याला या महात्म्यांनी पटवून दिले आणि तरीदेखील अशाप्रकारचे वक्तव्य भिडे करतात, याची कीव करावीशी वाटते, असे पवार म्हणाले. मनुवादी प्रवृत्ती या देशाला कदापि पुढे घेऊन जाऊ शकत नाही. ही अतिशय चुकीची प्रवृत्ती आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपला निषेध व्यक्त केला. लोकसभेच्या अध्यक्ष आणि ज्येष्ठ खासदार सुमित्रा महाजन यांनीसुद्धा ‘चले जाव’ चळवळीमुळे इंग्रज भारतातून गेले नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे अशाप्रकारची वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांच्या मागील बोलविता धनी कोण, हे शोधून काढायला हवे, असेदेखील पवार म्हणाले. 

संबंधित लेख