छगन भुजबळांवरील कारवाई ही सूडबुद्धीने- नवाब मलिक

01 Feb 2016 , 07:03:29 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात संचालनालयानी (इडी) कारवाई ही राजकीय आकसापोटी केल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नऊ ठिकाणच्या मालमत्तांवर इडीने सोमवारी धाडी टाकल्या, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.  

राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल चुकीचा प्रचार कसा करता येईल, याची काळजी सरकार घेत आहे, त्यासाठीच राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे, अशी टीका मलिक यांनी केली. भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे भुजबळांविरुद्ध कारवाई होणार हे जाहीर करतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी कारवाई होते, याचाच अर्थ हे सर्व नियोजित असल्याचे स्पष्ट होते असेही त्यांनी सांगितले. 'किरीट सोमय्या बोले आणि यंत्रणा डोले' असा प्रकार सुरू असल्याचा टोला मलिक यांनी लगावला. ही सर्व प्रकरणे न्यायालयप्रविष्ट आहेत. सत्य काय आहे हे न्यायालयात स्पष्ट होईल आणि छगन भुजबळांना न्यायालयाकडून नक्कीच क्लिन चिट मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सत्य हे सत्य असते हे भाजप आणि सरकारने लक्षात ठेवावे, असा इशाराही मलिक यांनी दिला.

संबंधित लेख