इतिहासात काळ्या अक्षरांनी नोंद करुन ठेवण्यासारखा दिवस - आ. हेमंत टकले

09 Jul 2018 , 08:51:33 PM

विधिमंडळाच्या इतिहासात विजेअभावी सभागृह तहकूब होण्याच्या या दिवसाची काळ्या अक्षरांनी नोंद करुन ठेवावी लागेल, असं म्हणण्याची वेळ या सरकारने आणली आहे, अशा शब्दात विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार हेमंत टकले यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. नागपूरमध्ये पावसामुळे अशी परिस्थती उद्भवू शकते याची पूर्वकल्पना यांना नव्हती का? यासाठी यंत्रणा सज्ज नव्हती का? असे प्रश्न टकले यांनी उपस्थित केले. ‘महंमद तुघलकी’ स्टाईलने, मेरी मर्जी...मला वाटेल ते मी करेन अशा पद्धतीने काम करणे आणि सगळ्या यंत्रणेचा गोंधळ होणं हे नक्कीच योग्य नाही असेही आमदार हेमंत टकले म्हणाले.

लोकांच्या करामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून हे सरकार चालतं, हे विधिमंडळ चालतं. त्या पैशाचं असं नुकसान होऊ देणं आणि कामकाज बंद होणं योग्य नाही, असेही ते म्हणाले. असं असेल तर अधिवेशन नागपूरला घेण्याचा हा अट्टहास कशासाठी केला आणि कुणासाठी केला? याचं उत्तर शासनाने दिलं पाहिजे अशी मागणीही टकले यांनी केली. प्रत्येकजण ही जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याने कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे अशी या शासनाची अवस्था झाली असल्याची टीकाही टकले यांनी केली.

संबंधित लेख