नियोजन नव्हते तर नागपूरात अधिवेशन घेण्याचा अट्टहास कशाला? - अजित पवार

09 Jul 2018 , 09:53:54 PM

आधी पावसाळी अधिवेशन नागपूरला घ्यायचं की नाही या निर्णयात सरकारने वेळ घालवला आणि घ्यायचं ठरवल्यानंतर यंत्रणेला काम करायला वेळ मिळाला नाही, त्यामुळे वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला. ही बाब निषेधार्ह असल्याचे सांगत विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. सबस्टेशनमध्ये पाणी साठल्याने वीज खंडित करावी लागली. विधानसभेच्या अध्यक्षांना प्रत्यक्षात पाहणी करावी लागली. हे काम संबंधित यंत्रणेचे आहे परंतु त्या यंत्रणेला काम करण्यासाठी जो वेळ दयावा लागतो तो वेळ दिला गेला नाही, असाही आरोप अजित पवार यांनी केला.

विधिमंडळात राज्यभरातील मतदारसंघातून आमदार लोकांचे प्रश्न घेऊन येतात, आपली भूमिका मांडतात, त्यातून प्रश्नांची तड लागावी असा प्रयत्न असतो. जनतेसाठी महत्त्वाचे मुद्दे आम्ही सभागृहात मांडत आहोत, त्याला उत्तर देण्याऐवजी पाऊस जास्त झाल्यामुळे कामकाज होऊ शकत नाही अशी केविलवाणी अवस्था राज्यकर्त्यांनी केली आहे, अशी टीका पवार यांनी केली. निव्वळ हट्टापायी हे सगळं घडलंय आणि त्यामुळे विधानभवन परिसरात पाणी तुंबलेले दिसत आहे. त्यामुळेच दिवसभराचे कामकाज ठप्प झाल्याबाबत पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

संबंधित लेख