निराधार,वंचित घटकांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करा - आ. राणा जगजितसिंह पाटील

10 Jul 2018 , 11:20:42 PM

शासनाच्या विशेष सहाय्य निधीमार्फत निराधार,अपंग आणि वंचित घटकांना मदत केली जाते. २०१० मध्ये एक जीआर काढण्यात आला होता त्यानुसार त्यांना निवृत्ती वेतन किंवा ६०० रुपये अनुदान देण्यात येते. ही रक्कम त्यांना वाढवून मिळत नाहीच शिवाय ती वेळेवरही मिळत नाही. आता महागाई वाढली असल्याने ही रक्कम वाढवण्यात यावी अशी मागणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पुरवण्या मागण्यांवर बोलताना सभागृहात केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तडवळे येथे भेट दिली होती. तेथे त्यांनी परिषदही घेतली होती. लोकांची भावना आहे की तिथे त्यांचे स्मारक व्हावे. सरकारने निधी दिला परंतु तो अपुरा आहे. हे स्मारक भव्य व्हावं. लोकांना त्यातून उपयोग व्हावा असे ते स्मारक असावे. त्यासाठी बैठक बोलवा आणि हा प्रश्न मार्गी लावा अशी मागणीही पाटील यांनी केली.

जिल्हयात १०८ रुग्णवाहिका सेवा कमी पडत आहे, त्याकडे सरकारने लक्ष द्यावे शिवाय उस्मानाबाद येथे एक सिव्हिल हॉस्पिटल बांधले आहे परंतु ते अदयाप कार्यान्वित नाही. सरकारने यात लक्ष घालून ते कार्यान्वित करावे. उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात महिलांसाठी खाटांची संख्या कमी आहे. याबाबतही सरकारने योग्य नियोजन करुन सुविधा उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी त्यांनी केली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील पारधी समाजाला न्याय मिळत नाही. त्यांच्या विकासासाठी हवा तसा निधी मिळत नाही सरकारने या समाजघटकाचाही विचार करावा, असेही आमदार राणा जगजितसिंह म्हणाले.

संबंधित लेख