भीमा-कोरेगाव दंगलीमुळे आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान – प्रकाश गजभिये

11 Jul 2018 , 10:37:26 PM

भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी हजारो दलितांना अटक करण्यात आली, त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली, अनेक दलितांवर कारवाई करण्यात आली. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही या दंगलीचा प्रमुख सूत्रधार संभाजी भिडे याला अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. दंगलीतील हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. अजूनपर्यंत या समितीचा अहवाल सभागृहात आलेला नाही. या घटनेमुळे राज्यस्तरावरच नाही तर देशभरात महाराष्ट्राची मान शरमेने झुकली आहे, तरीदेखील याप्रकरणात कारवाई केली जात नाही, हे खेदजनक असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश गजभिये यांनी आज विधान भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना केले. आज सभागृहात वेलमध्ये उतरून संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करत विरोधकांनी गोंधळ घातला तसेच भिडेला अटक होईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. 

मी संभाजी भिडेचे वेषांतर करून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला, तरीही सरकार हलत नाही, यांचा या प्रकरणावरील अभ्यास संपणार तरी कधी? असा संतप्त सवाल गजभिये यांनी केला. याला नक्षलवादाचे वळण देऊन नाहक कलाटणी देण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या दंगलीमुळे आंबेडकरी चळवळीचे नुकसान झाले आहे, अनेक विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संभाजी भिडेच्या अटकेबरोबरच विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.  

संबंधित लेख