नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे; विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन...

12 Jul 2018 , 07:29:39 PM

नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी विरोधकांनी गुरूवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. ‘नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे’, ‘नाणार प्रकल्पात सुरु आहे मांडवली, खरं सांगा किती मिळाली दलाली’, ‘म्हणे नाणार जाणार, नाणार जाणार...खोटं बोलणं सोडायला सांगा तुम्ही किती घेणार’, ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘पीकविम्याची नुकसानभारपाई मिळालीच पाहिजे...शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘फेकू सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. सभागृहात नाणारला आक्रमक विरोध होणार, याची झलकच विरोधकांनी दाखवून दिली. गुरूवारी कामकाज सुरु होण्याआधीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देत विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनामध्ये पीकविमा नुकसानभरपाई, बोंडअळीची नुकसानभरपाई याविषयी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार राजेश टोपे, आमदार, आमदार विजय भांबळे, वैभव पिचड, विक्रम काळे आदींसह सर्व आमदार या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. याशिवाय काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींसह इतर आमदारही सहभागी होते.

संबंधित लेख