ग्रीन रिफायनरी आणि न्युक्लियर पॉवर प्रोजेक्ट एकत्र आल्यास मोठा धोका - भास्कर जाधव

12 Jul 2018 , 08:31:01 PM

ग्रीन रिफायनरी आणि न्युक्लियर पॉवर प्रोजेक्ट यावर आज सभागृहात आणि सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना आ. भास्कर जाधव यांनी मत व्यक्त केले. ग्रीन रिफायनरी आणि न्युक्लियर पॉवर प्रोजेक्ट एकत्र आल्यास मोठा धोका होऊ शकतो असे विधान अनिल काकोडकर यांनी केले होते. या वक्तव्याचा गांभीर्याने विचार करावा असे जाधव म्हणाले. जगात कुठे ही न्युक्लियर पॉवर आणि ग्रीन रिफायनरी प्रकल्प एकत्र नाही असे प्रतिपादन करत त्यांनी ग्रीन रिफायनरी आणि न्युक्लियर पॉवर प्रोजेक्ट एकत्र नसावा अशी भूमिका घेतली.

एकीकडे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला मान्यता दिली आहे. दुसऱ्या बाजूला ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. या दोन्ही प्रकल्पात एरियल अंतर २.५ किलोमीटर इतके कमी असल्याने हा प्रकल्प धोकादायक आहे, असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले. हा फक्त नजीकच्या सतरा गावांचा प्रश्न नाही तर हा संपूर्ण कोकणाचा प्रश्न असल्याचे त्याने सांगितले. कोकणाच्या आजूबाजूला सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हेही आहेत. या जिल्ह्यांनाही प्रकल्पांचा धोका असल्याने सरकारने हा हट्ट सोडावा असे ते म्हणाले. आम्ही कोकणातील लोक जीवंत राहिलो तरच आम्हाला रोजगार मिळेल. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर तात्काळ चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली.

संबंधित लेख