दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावर विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसने उठविला आवाज

16 Jul 2018 , 07:14:49 PM

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेचे लक्ष वेधले. दुष्काळी परिस्थितीत, अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना जगवणारा दुधाचा धंदा असल्याने सरकारने याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. सरकार शेतकऱ्यांसाठी समाधानकारक तोडगा काढण्यास कमी पडत आहे, अशी जोरदार टीका विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा हमीभाव मिळावा, यासंदर्भात मांडण्यात आलेल्या स्थगन प्रस्तावावर ते बोलत होते. राज्यभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दुधाच्या संदर्भात अध्यक्षांच्या उपस्थितीत सुमारे तीन वर्षांपूर्वी एक बैठक झाली होती. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. दुधाच्या पावडरला ३ रूपये तर दुधाला ५ रूपये देण्याची मागणी आहे. पण सरकार वेळ मारून नेण्याचे काम करत आहे. हे काही बरोबर नाही असा आरोपही पवार यांनी केला. सरकारने दूध उत्पादकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. टँकर जाळले जात आहेत, असेही ते म्हणाले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना ७०:३० च्या फॉर्म्युल्यानुसार दर देण्याचे सरकारतर्फे बोलले जात आहे. याचा शेतकऱ्यांना काही उपयोग होणार नाही. सरकारने व्यवहारी मार्ग काढून योग्य भूमिका घ्यावी. आज संपूर्ण शेतकरीवर्गाचे लक्ष या अधिवेशनाकडे आहे, असे त्यांनी नमूद केले.

या प्रस्तावावर बोलताना विधिमंडळ गटनेते आ. जयंत पाटील यांनी, दूग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सभागृहात दुधाबाबत निवेदन दिले. मात्र मंत्र्यांनी नवे काहीच सांगितले नाही, असा आरोप केला. कर्जमाफीच्या वेळी कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची घोषणा सरकारने केली. त्याचप्रमाणे पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे, पाच रुपये अनुदान देताना निर्यातीचा बंध ठेवू नये, दुधाच्या भुकटीवर प्रति किलो ५० रुपये अनुदान देऊन सरकारने खासगी लोकांना मदत करू नये. सरकारने शेतकऱ्यांच्या दुधाचा खप कसा होईल याचा विचार करावा, असेही ते म्हणाले.

दुधाला ५ रुपये अनुदान मिळावे यासाठी आज महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वी दुधावर लक्षवेधी मांडण्यात आली तेव्हा सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. सरकारने जर त्याचवेळी निर्णय घेतला असता तर आंदोलन झाले नसते असे वक्तव्य आ. हसन मुश्रीफ यांनी केले. आमचा शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले. 

संबंधित लेख