दुधाच्या प्रश्नावर आमदार सुनिल तटकरे यांचा स्थगन प्रस्ताव...

16 Jul 2018 , 10:40:21 PM

दूध दराबाबत सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याने शेतकरी आज रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करत आहे आणि दूग्धमंत्री गाठ माझ्याशी आहे अशी धमकी शेतकऱ्यांना देत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या गंभीर विषयावर नियम २८९ अन्वये चर्चा व्हावी, अशी मागणी आमदार सुनिल तटकरे यांनी सभागृहात केली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तत्कालीन सरकारने दूध उत्पादक वाढीला पोषक असे धोरण राबवले होते, मात्र आत्ताच्या सरकारने अक्षरश: शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोपही तटकरे यांनी केला.

शेतकऱ्यांच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगण्याचे काम आणि कर्जमाफीच्या काळात शेतकऱ्यांच्या झोळीत प्रत्यक्षात पडलेले दान लक्षात घेता विसंगती दिसते. दुधाला दर मिळण्याबाबत दूध उत्पादकांनी सरकारशी सातत्याने चर्चा केली आणि करते आहे. दुधाच्या भुकटीला किलोला ५० रुपये आणि दुधाला ५ रुपये अनुदान दिले जाईल असे शासनाने जाहीर केले. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. आज हजारो लिटर दूध शेतकरी रस्त्यावर ओतून टाकत आहेत. अधिवेशन काळात हे दूध उत्पादकांचे राज्यभर आंदोलन सुरु आहे तेव्हा सभागृहात इतर विषय बाजूला ठेवून नियम २८९ अन्वये चर्चा करावी, अशी मागणी तटकरे यांनी केली.

सभागृहात सत्ताधारी पक्षातील शिवसेनेनेही ही मागणी केली, त्यामुळे जोरदार गोंधळ निर्माण झाला व सभापतींना सभागृहाचे कामकाज २० मिनिटासाठी तहकुब करावे लागले.

संबंधित लेख