छत्रपतींचा अपमान करणाऱ्या अतुल भातखळकरांचे निलंबन व अटक करा - राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी

17 Jul 2018 , 09:24:39 PM

मनुवादी भातखळकरचा निषेध असो...भातखळकरांचे निलंबन करा...छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विधानसभेतील छिंदमला अटक करा...भाजप सरकारचा निषेध असो...अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर मंगळवारी जोरदार आंदोलन केले.
विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीचा विषय चांगलाच गाजला. यावेळी चर्चा सुरु असतानाच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विरोधक ‘भलत्याच’ गोष्टींवर चर्चा करतात असे बोलल्यानंतर सभागृहामध्ये गदारोळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी वेलमध्ये उतरत जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो...जय भवानी,जय शिवाजी अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी भातखळकरांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. त्यामुळे सुरुवातीला १० मिनिटांसाठी आणि नंतर पुन्हा १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

याचवेळी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी अतुल भातखळकरांचे निलंबन केल्याशिवाय आम्ही सभागृह चालू देणार नाही, असा इशारा सभागृहात दिला. ही मनुवादी प्रवृत्ती आहे. महाराष्ट्रात राहून छत्रपतींचा अपमान करणाऱ्या भातखळकरांचा निषेधही पवार यांनी केला.

यावेळी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार विजय भांबळे, आमदार प्रदीप नाईक,आमदार संजय कदम आदींसह सर्वच आमदार सहभागी झाले होते.

सभागृह पुन्हा सुरू झाल्यावर आ. अतुल भातखळकर यांनी सभागृहाची आणि महाराष्ट्राची माफी मागितली व आपले शब्द मागे घेतले. तरीही विरोधक त्यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर ठाम राहिले. तेव्हा अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत, त्यांचा अवमान कोणीही सहन करू शकत नाही, असे म्हणतानाच मात्र अधिवेशनाचे बरेच कामकाज बाकी असल्याने या मुद्द्यावर अध्यक्षांनी अर्धा तास बैठक बोलवावी, अशी मागणी केली. 

संबंधित लेख