संविधानाला दुबळं करणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धडा शिकवेल – शरद पवार

23 Jul 2018 , 06:42:10 PM

मुंबई शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद प्रस्थापित करण्यासाठी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागात राष्ट्रवादीची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. त्याचप्रमाणे मुंबई शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व मजबूत करण्यासाठी सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन शिबीर आयोजित केले गेले. पक्षाची आखणी करण्याबाबत मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सत्ताधारी पक्षाच्या अपयशाची माहिती देत लोकांच्या गरजा व त्यांचे प्रश्न आपण कसे सोडवू शकतो व हाच आपल्याला मिळणारा पाठिंबा आहे याचे महत्त्व पटवून देण्यात आले. 


मुंबईतील कार्यक्रमास मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबाबत आनंद व्यक्त करतानाच देशात जातीयवादी घटना वाढत असल्याती खंत राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली. देशात अनेक ठिकाणी अफवांवरून हत्या घडत आहेत. मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला दडपशाहीतच ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस दिसून येतोय. हा सत्ताधारी पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला बदलण्याचा किंबहुना उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर असल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा जमेल ती किंमत मोजेल तयार आहे, पण देशाच्या राज्य घटनेवर गदा येऊ देणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली. सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले होते की आपण देश घडवून दाखवू. यासाठी त्यांनी जी निती वापरली त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या देशाचा रुपया घसरला, याचा अर्थ आपल्या देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. ही टीका आम्ही सत्तेतील पक्षावर करत नसून त्यांच्या कार्यप्रणालीवर करत असल्याचेही ते म्हणाले. संसदेत काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांना दाखवून दिले की आम्ही तुमच्याबद्दल वाईट चिंतन करीत नाही. संविधानावर गदा आणण्याचे काम सत्ताधारी पक्ष करीत आहे. यांना धडा शिकवण्याचे काम हा सामान्य माणूसच करू शकेल. लोकशाहीवर अन्याय करणाऱ्या, संविधानाला दुबळे करणाऱ्या अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धडा शिकवेल असे आव्हान त्यांनी दिले.

सरकारच्या चार वर्षांच्या कारभाराबद्दल सर्वच जाती-धर्मातील आणि सर्व स्तरातील लोकांमध्ये एक असमाधानाची भावना आहे. नरेंद्र मोदी यांच्या बद्दलची लोकभावना बदलायला लागली आहे. आता मोदी सरकारच्या चुका लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण अत्यंत गांभीर्याने करायला हव असे मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडले. भाजपचे संख्याबळ जास्त असले तरिही लोकसभेत अविश्वासदर्शक ठराव सरकारविरुद्ध मांडण्यात आला आणि सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकालात झालेल्या चुकांचा लेखाजोखाच त्यातून मांडला गेला. कार्यकर्त्यांनी सत्ता परिवर्तनात आपण मोठा बदल घडवू शकतो, हा आत्मविश्वास ठेवायला हवा असे ते म्हणाले. भाजपचे मित्रपक्ष असलेल्या काही पक्षांनी फारकत घेतली तर काही नाराज आहेत. अनेक पक्ष सरकारच्या विरोधात बोलायला लागले आहेत. त्यामुळे जी आघाडी उत्तम, ज्यांची बांधणी उत्तम ते पुढील काळात सत्तेत येण्याची शक्यता असल्याचा दावा करत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं. सरकारचे अपयश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी रस्त्यांवर उतरण्याचा सल्ला त्यांनी दिला.

या मार्गदर्शन शिबिरास खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय महिला प्रदेशाध्यक्ष्य फौजिया खान, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार छगन भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार किरण पावसकर, आमदार विद्या चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष्य चित्रा वाघ, कोषाध्यक्ष हेमंत टकले, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख