शेतकरी, विदर्भाचे प्रश्न आणि घोटाळ्यांवर सरकारचे पलायन - धनंजय मुंडे

23 Jul 2018 , 09:10:09 PM

नागपुरात अधिवेशन घेऊन विदर्भासाठी आम्ही खूप काही करत आहोत, असा आव आणणाऱ्या सरकारने विदर्भातील शेतकरी, विदर्भाचे प्रश्न आणि उपस्थित केलेल्या डिजिटल महाराष्ट्राच्या घोटाळ्यांच्या प्रकरणांना साधे उत्तर देण्याचेही सौजन्य दाखविले नाही. हे सरकार पळपुटे आहे, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध करीत विरोधकांनी सभात्याग केला. नागपूर अधिवेशनाच्या समारोपानंतर पत्रकारांशी बोलतांना अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याला मिळालेल्या तुटक्या-फुटक्या उत्तराचा आणि अधिवेशनाचा धनंजय मुंडे यांनी जोरदार समाचार घेतला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून मागणी लावून धरली, सरकारशी संघर्ष केला. अंतिम आठवडा प्रस्तावात विदर्भाचे प्रश्न, सिंचनाचे विषय, मुंबई विकास आराखड्यातील घोटाळे, डिजिटल महाराष्ट्राचा घोटाळा, मोबाईल खरेदी घोटाळा मांडला. मात्र यातील एकाही प्रश्नाला सरकारने उत्तर दिले नाही. यापूर्वी खोटे उत्तर देऊन क्लिनचिट दिली जायची. यावेळी मात्र न बोलताच क्लिनचिट देण्याची नवीन परंपरा सरकारने सुरू केल्याचा टोला मुंडे यांनी लगावला.

बोंडअळीच्या नुकसानभरपाईबाबत आम्ही विषय लावून धरला, सरकारने बियाणे कंपन्यांकडे चेंडू टोलवला त्याऐवजी स्वतः निधीतून मदत द्यावी आणि बियाणे कंपन्यांकडून वसुली करावी, ही मागणी सरकारने धुडकावून लावली. या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफीतून केलेली फसवणूक, पीकविम्यातील घोटाळा, बोंडअळीची न मिळालेली नुकसान भरपाई, मावा-तुडतुडा रोगामुळे धान पिकाच्या नुकसानीची भरपाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, खरीपाचे पीक कर्ज, हमीभाव, तूर, हरभऱ्याचे पैसे, असे शेतकऱ्यांचे प्रश्न या सभागृहात मांडले. परंतु आंधळ्याचे आणि बहिरेपणाचे सोंग घेतलेल्या सरकारने यातल्या कोणत्याही प्रश्नाला पूर्ण न्याय दिला नाही, असा आरोप मुंडे यांनी केला.

दूध दराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही आवाज उठवला. सभागृहातला आवाज आणि बाहेर रस्त्यावर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा संयुक्त परिणाम म्हणून अखेर सरकारला नमावं लागलं, असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारनं पुन्हा एकदा समाजाची दिशाभूल केली आहे. भरतीतल्या १६ टक्के जागा रिकाम्या ठेवण्याच्या निर्णयाचा फायदा मराठा समाजाला कधीपर्यंत मिळणार, मिळणार की नाही मिळणार हे स्पष्ट नाही. एखाद्या फ्रेममध्ये, मिठाईचा फोटो लावून ती भेट देण्यासारखा हा प्रकार आहे. ती मिठाई फक्त बघायची, खायला कधीच मिळणार नाही, असा हा १६ टक्के जागांचा जुमला आहे, अशई टीका मुंडे यांनी केली.  

तीन आठवडी अधिवेशन संपल्यानंतरही नाणार राहणार की जाणार? याबाबत संभ्रम कायम आहे. केवळ नाणारच नाही, तर शिवसेनेच्या भूमिकेबाबतचा संभ्रम तर अधिक वाढला आहे. समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेनचा प्रकल्प, कुणाच्या हितासाठी आहे, हे सरकार सिद्ध करु शकलं नाही. जनतेचा तीव्र विरोध असूनही प्रकल्प का रेटला जातोय, राज्याच्या तिजोरीतून हजारो कोटी कुणाच्या इच्छेसाठी खर्च होत आहेत. याचा जाब सरकारला विचारल्याचे मुंडे यांनी सांगितले.

नाशिकच्या आदिवासी मुलांवर लाठीमार करुन जेलमध्ये टाकण्याचा विषय, नागपूरच्या अधिवेशनावर आलेला शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा, नाणारच्या बांधवांचा मोर्चा, इतरही अनेक जण आपल्या व्यथा घेऊन या अधिवेशनात आले, परंतु कुणालाही न्याय मिळाला नाही, या बाबतीत त्यांनी खंत व्यक्त केली. विदर्भ-मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाचे रखडलेले प्रकल्प, रखडलेला औद्योगिक विकास, गुंतवणुकीतली मंदी, घटलेले रोजगार अशा अनेक मुद्द्यांवर सरकार तोंडघशी पडलं. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधान भवनात पाणी शिरल्याने आणि वीजपुरवठा बंद झाल्याने कामकाज दिवसभर बंद राहिलं. गेल्या ६० वर्षात पहिल्यांदाच ही नामुष्की आली. शेवटच्या दिवशीही, सभागृहाच्या लॉबीतल्या लाईट बंद होत्या. त्यामुळे सरकारमध्ये काही सुधारणा झाली नाहीये, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे मुंडे म्हणाले.

मुंबईवासियांवर अन्याय करणाऱ्या, बिल्डर धार्जिण्या विकास आराखड्यातले, घोटाळे आम्ही सभागृहात मांडले. लाखो-करोडो रुपयांची खिरापत एफएसआयच्या माध्यमातून बिल्डरांना कशी वाटण्यात आली, याचे पुरावे आम्ही दिले.
रत्नाकर घुट्टे यांचा ८ हजार कोटींचा घोटाळा आम्ही सभागृहात उघड केला. पारदर्शक कारभाराच्या नावावर, सरकारकडून आयटीक्षेत्रात झालेला गैरव्यवहार आम्ही मांडला. मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न लावून धरल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

राज्य सरकारच्या खिशात दमडी नाही, परंतु घोषणांचा पाऊस पाडला जातोय. घोषणा पूर्ण करायच्या असतात, याची जाण व भान या सरकारला नाही. राज्यातील जनतेच्या इच्छा आम्ही सभागृहात मांडल्या. परंतु सरकारच्या तिजोरीतून काहीही बाहेर पडलं नाही. त्यामुळे हे अधिवेशन विदर्भ आणि राज्यतील जनतेची निराशा करणारे ठरल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

संबंधित लेख