सरकारने दिलेला शब्द पाळला असता तर आज आंदोलनाची वेळ आली नसती. – धनंजय मुंडे

25 Jul 2018 , 09:15:46 PM

मराठा आरक्षणाची लढाई प्रतिष्ठेची नाही तर पोटाची आहे. या मुद्द्यावर पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात अनेकवेळा स्थगन प्रस्ताव मांडला, वेळप्रसंगी सभागृह बंद पाडले, तरीदेखील सरकारला जाग येत नाही, अशी खंत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली. मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून परळी येथे ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची भेट घेऊन मुंडे यांनी आंदोलकांशी संवाद साधला. सरकारने दिलेला शब्द पाळला असता तर मराठा बांधवांना आज अशाप्रकारे आंदोलन करण्याची वेळ आली नसती. असे बालिश बुद्धीचे सरकार आपण कधी पाहिले नाही, समाजभावना सरकारला कळत नसेल तर या सरकारला बालिशच म्हणावे लागेल, अशी टीका मुंडे यांनी केली. सरकारने डिवचण्याचा प्रयत्न केला, तरी हे आंदोलन शांतपणेच व्हायला पाहिजे. समाजाला न्याय मिळावा हीच आपली भावना आहे. सरकार काय बोलले त्याला उत्तर देण्यासाठी ही लढाई नाही. मोर्चाला गालबोट लागेल असं काही करू नका असे आवाहन त्यांनी आंदोलकर्त्यांना केले. तसेच, सरकारने वेळीच निर्णय न घेतल्याने राज्यातील परिस्थिती बिथरल्यास त्याची जबाबदारी सरकारची असेल, असेही ते म्हणाले. 

संबंधित लेख