सामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरा – शशिकांत शिंदे

25 Jul 2018 , 09:57:25 PM

केंद्र व राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांच्या विरोधातील सरकार आहे. सत्ता आणि पैशांच्या जोरावर ते निवडणुका जिंकत आहे. मात्र सध्याच्या ध्येय-धोरणांमुळे सर्वसामान्य माणूस पिचला आहे. जनता भाजपला कंटाळली आहे. आगामी निवडणुकांमध्ये सत्तांतर अटळ आहे. हीच योग्य वेळ आहे, या सरकारच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शशिकांत शिंदे यांनी केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे उत्तर महाराष्ट्र बुथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळावा नाशिक येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील सरकारवर हल्ला चढवताना शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी सरकारला काही देणे घेणे नाही असा आरोप करतानाच आगामी निवडणुकांसाठी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले.


मुद्रा योजना, स्कील डेव्हलपमेंट योजना तसेच विद्यार्थ्यांची शिष्यावृत्ती अशा विविध प्रश्नी सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे. येत्या काळात विद्यार्थ्यांना सोबत घेऊन राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिला. या मेळाव्याप्रसंगी मालेगाव व दिंडोरी तालुक्यातील विविध पक्षांमधील युवकांनी शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार दीपिका चव्हाण, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, माजी आमदार जयंत जाधव, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, अविनाश आदिक, नाना महाले, डॉ. भारती पवार, प्रेरणा बलकवडे, संदीप मुळवे आणि उत्तर महाराष्ट्रातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख