सरकारने घटनेत दुरुस्ती करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा - खा. शरद पवार

30 Jul 2018 , 06:35:59 PM

मराठा समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी शांतीपूर्ण आणि संयमित मार्गाने काढण्यात आलेल्या मोर्चांची जगभरातील वृत्तपत्रांनी दखल घेतली. सुमारे ५८ मोर्चे शांतामय मार्गाने राज्यात निघाले. या मोर्चांचं जगभरात कौतुक होत असताना राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी मात्र फक्त आश्वासने दिली. गेल्या चार वर्षांत आरक्षणाबाबात काहीच हालचाल न झाल्याने मराठा तरुणांच्या मनात एक अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला., असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केले. 

पुढे बोलताना पवार म्हणाले की, “महाराष्ट्रात सध्या एक अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे जे राज्याच्या हिताचे नाही. अशा परिस्थितीत राज्यसरकारमधील मंत्र्यांकडून वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत. महाराष्ट्रात वारीला एक परंपरा आहे. मोठ्या उत्साहात व शांतीपूर्ण भावनेने अनेक वर्षांपासून वारी निघते. वारीत कधी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा इतिहास नाही. अशात वारीमध्ये साप सोडले जातील, चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होईल असे वक्तव्य राज्य प्रमुखांकडून केले गेले. सरकारने यातून त्वरीत तोडगा काढण्याची गरज असतानाही मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी चार वर्षे काढली आणि त्यानंतर अशी बेताल वक्तव्ये केली. आगीत तेल टाकण्याचे काम एकाप्रकारे विविध माध्यमातून केले गेले. त्यामुळे तरुणांचा संताप अनावर झाला आणि परिस्थिती बिघडली. कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनीदेखील फोन रेकॉर्डिंगबद्दल असेच वक्तव्य केल्याचे मला कळले. कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याचे ते संभाषण आहे हे स्पष्ट व्हायला हवे. ही परिस्थिती चिघळायला अशा प्रकारची वक्तव्ये जबाबदार आहेत.”

सरकार म्हणते की मराठा समाजाला आरक्षण देण्यास कायदेशीर अडचणी आहेत. पण कायदेशीर अडचणीतूनही मार्ग काढता येतो. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. केंद्राने घटनेत थोडी दुरुस्ती करण्याची भूमिका घेतली आणि प्रस्ताव संसदेत मांडला तर हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. संसदेत ठराव करताना विरोधी पक्षांची मदत लागल्यास त्यांच्याशी समन्वय साधून पुढाकार घेण्यास मी तयार आहे, अशी ग्वाही पवार यांनी दिली. राष्ट्रवादीच्या खासदारांनी याबाबतची भूमिका वेळोवेळी संसदेत मांडली आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी लागेल ती मदत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल, पण हा तिढा त्वरित सुटायला हवा, असे पवार म्हणाले. 

आंदोलनाला गालबोट लागेल असे काहीही करू नका. प्रत्येकाच्या भावना महत्त्वाच्या आहेत. पण राज्य सरकारच्या नाकर्तेपणाची किंमत सामान्य लोकांना मोजावी लागू नये याची काळजी आंदोलकांनी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले.

संबंधित लेख