प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार हतबल – शशिकांत शिंदे

01 Aug 2018 , 09:56:15 PM

केंद्र व राज्यातील सरकार लोकांचे प्रश्न सोडवताना हतबल झाले आहे. सरकारने विश्वासार्हता गमावली असून प्रत्येक समाजघटकामंधील नाराजीचा फटका येणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना बसणार आहे, अशा तीव्र शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री शशिकांत शिंदे  यांनी रविवारी भाजपवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्षम विरोधी पक्ष असून युवकांमध्येच परिवर्तनाची शक्ती असल्याचेही शिंदे म्हणाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पश्चिम विदर्भ बुथ कमिटी संकल्प मेळावा अकोला येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा मेळावा मराठा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. मराठा आरक्षणावरुन झालेल्या उद्रेकावरही माजी मंत्री शिंदे यांनी भाष्य केले. राज्यात उद्रेक सुरू असून त्याचे खापर मात्र विरोधकांवर विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर फोडले जात आहे. मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला भाजपने सत्ता स्थापन होण्यापूर्वी आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनाची पूर्तता केली नाही. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकार ठोस निर्णय घेत नाही. केंद्र व राज्यातील सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे केवळ भूमिपूजन केले. शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची करण्याचे काम सरकार करीत आहे. स्मारकाची उंची कमी केल्याने छत्रपतींची उंची कमी होणार नाही, असेही ते म्हणाले.


युवकांना संधी द्या : संग्राम कोते पाटील
विधानसभांसह इतरही निवडणुकांमध्ये युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने संधी द्यावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले. राज्यात ९३ हजार ४०० बुथ आहेत. या सर्व बुथमध्ये मोट बांधण्याचे काम राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांना करायचे आहे. बुथची संकल्पना राबवताना ते युवक राष्ट्रवादीच्या विचारांचे असावेत असे ते म्हणाले. शिष्यवृत्ती, कौशल्य विकासाची योजना कशा कुचकामी ठरत आहेत, हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

संबंधित लेख