राज्यात काय सुरू आहे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे का? - चित्रा वाघ

02 Aug 2018 , 09:59:44 PM

सांगलीत आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. राज्यात अशा घटना वाढताना दिसत आहेत. महिला व मुलींवरील अत्याचाराचे सत्र कुठेही थांबलेले दिसत नाही. सांगलीतील या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून प्रत्येक वेळी कायदा-सुव्यवस्थेची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात काय सुरू आहे याकडे लक्ष देण गरजेचे आहे, अशी टीका वाघ यांनी केली.  

या घटनेची सविस्तर माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सांगली जिल्हाध्यक्षा छाया पाटील, शहराध्यक्षा विनया पाठक घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. अशा घटनांना आळा कसा घालता येईल हे बघणे गरजेचे आहे. कायदे बनवले गेले पण ते कागदावरच आहेत. लोकांना कायद्याचा धाक वाटत नसल्याचे दिसून येत आहे. यातूनच अशा गोष्टींचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे, असे मत वाघ यांनी व्यक्त केले. अशा घटना यापुढे राज्यात होऊच नयेत, यासाठी काय करता येईल हे बघणे आपले कर्तव्य आहे. सामाजिक जनजागृती व कायद्याबाबत सजगता असणे गरजेचे आहे. यातूनच अशा गोष्टींचे प्रमाण कमी होईल, असे वाघ म्हणाल्या.

संबंधित लेख