सांगलीत आमचा पराभव बंडखोरांनी केला - आ. जयंत पाटील

06 Aug 2018 , 06:58:01 PM

"सांगली महापालिका निवडणुकीचा कौल आम्हाला मान्य आहे. मात्र आमचा पराभव बंडखोरांना अनपेक्षितरीत्या मिळालेल्या जास्त मतांमुळे झाला, भाजपमुळे नाही. निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहिल्यास तब्बल ६६ टक्के नागरिकांनी भाजपला नाकारले आहे. म्हणजेच आघाडीचा विचार जनतेने स्वीकारला,'' असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.

महापालिका निवडणूक निकालावर मत मांडताना पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, "या निवडणुकीत भाजपला ३४, तर आघाडीला ३७ टक्के मते मिळाली. आघाडीच्या बंडखोरांना १० टक्के मते मिळाली. त्यामुळे आघाडीचा पराभव हा भाजपमुळे नाही, तर बंडखोरांमुळे झाला. राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव कमी मतांनी झाला. तेथे बंडखोरांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. बंडखोरी टाळण्यासाठी चारचार वेळा बैठका घेतल्या. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही.''
निकालानंतर पराभूत होणारे ईव्हीएमचे नाव घेतात, पैशाचा वापर झाला हे पराभवानंतर ठरलेले वक्तव्य असते, असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर "निकाल लागल्यानंतर ईव्हीएमबाबत आम्ही काहीही बोललो नसताना त्यांनीच कसे काय विधान केले? ईव्हीएम व पैशाबाबत त्यांनाच कशी काय आठवण झाली?' असा उपरोधिक प्रश्न जयंत पाटील यांनी केला. आम्ही तसा आरोप करण्याआधीच, लोकांना भेटवस्तूंचे वाटप करा, बॅगा भरून सांगलीला मुक्कामाला जाणार, असे कोण म्हणाले, याची आठवणही पाटील यांनी करून दिली.

संबंधित लेख