दूरदर्शनच्या माध्यमातून सरकार चालवता येत नाही - नवाब मलिक

07 Aug 2018 , 12:17:58 AM

मुख्यमंत्र्यांनी दूरदर्शनच्या माध्यमातून सरकारची भूमिका लोकांसमोर मांडली. दूरदर्शनच्या माध्यमातून सरकार चालवता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण कायदेशीर देण्याचे जाहीर केले आहे. सरकार कालबध्द कार्यक्रम जाहीर करत आहेत, परंतु त्यांनी गेल्या चार वर्षात हा कार्यक्रम जाहीर केला असता तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.
मराठा आरक्षण नोव्हेंबरअखेर देण्याचे मुख्यमंत्र्यांनी दूरदर्शनच्या माध्यमातून जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेवर नवाब मलिक यांनी टीका करतानाच मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत याअगोदर लोकांशी संवाद साधायला हवा होता. तसा संवाद न साधता ते टेलिव्हिजनच्या माध्यमातून संवाद साधत असल्याबाबतचा आक्षेप व्यक्त केला.

विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची भूमिका बजावली पाहिजे हे खरं आहे. सर्व पक्ष मराठा आरक्षणावर कोणतीही विरोधी भूमिका बजावत नाही किंवा कुठलेही अडथळेही निर्माण केलेले नाहीत. उलट सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी भूमिका विरोधी पक्षांची होती.

मराठा आरक्षणाबाबत संवाद साधला पाहिजे हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत. मात्र मुख्यमंत्र्यांनी इतके दिवस आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. आज सांगत आहेत की, ते संवाद साधायला तयार नाहीत. संवाद सुरु करण्याचे प्रयत्न का करत नाही नुसतं टेलिव्हिजनवर बोलून दाखवत आहेत अशी जोरदार टीकाही नवाब मलिक यांनी केली. हा प्रश्न निकाली काढण्याबाबत त्यांची भूमिका असेल तर आमची विरोधक म्हणून सकारात्मक भूमिका राहील. आमच्याकडून कुठलेही अडथळे असणार नाहीत, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर राज्यात हिंसेचे प्रकार वाढीस लागले. त्यावेळी आमच्या पक्षाने स्पष्ट भूमिका मांडली होती की त्या लोकांशी संवाद साधा, हिंसा करु नका, आत्महत्या करु नका असे वारंवार आवाहनही लोकांना केले होते असेही नवाब मलिक म्हणाले.

संबंधित लेख