घोषणा करणे आणि स्थगिती देणे हेच मुख्यमंत्र्यांचे काम – नवाब मलिक

07 Aug 2018 , 12:27:23 AM

घोषणा करणे आणि त्या घोषणांना स्थगिती देणे हीच भूमिका मुख्यमंत्र्यांची सातत्याने राहिली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मराठा आरक्षण नोव्हेंबरमध्ये लागू करण्याचे संकेत देतानाच ७२ हजार नोकरभरतीला स्थगिती दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांच्या या घोषणेचा समाचार घेताना नवाब मलिक यांनी थेट आरोप केला. सरकारने भरतीवर बंदी टाकली होती. तो निर्णय गैर होता हे आता स्पष्ट होत आहे. सर्वच खात्यांमधील कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे सातत्याने भरती प्रक्रिया सुरु राहिली पाहिजे. मात्र मोठा आकडा निर्माण करुन नंतर मेगाभरती करू, ही सरकारची भूमिका चुकीची आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्याचा परिणाम कामावर दिसत आहे. कर्मचाऱ्यांची भूमिका आहे की नवीन नोकरभरती केली पाहिजे. ताण कमी करण्याची जबाबदारी सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची असते. त्यामुळे कर्मचारी,अधिकारी यांचे समाधान होईल अशी भूमिका सरकारने घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. नोकरभरतीबाबत जर नोटिफिकेशनच निघाले नाही तर स्थगिती कशी दिली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

संबंधित लेख