राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे संपन्न

09 Aug 2018 , 06:39:04 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. १९९० साली देशात मंडल आयोग लागू करण्यात आला. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यास कोणीही तयार नव्हते पण शरद पवार साहेबांनी त्या शिफारशी लागू केल्या. पवार साहेबांनी मराठवाडा विद्यापीठालाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे काम केले. या दोन्ही प्रसंगांच्यावेळी पवार साहेबांवर टीका झाली पण ते डगमगले नाहीत. दबलेल्या वर्गाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. मात्र काही झाले की पवार साहेबांकडे बोट दाखवायचे हे भाजपचे काम आहे. भाजपच्या सरकारने भुजबळ साहेबांना जाणूनबुजून अडचणीत आणले. जेव्हा जामीन मिळण्याची वेळ होती तेव्हा त्यांनी अडचणी निर्माण करत भुजबळ साहेबांना त्रास दिला, असेही ते म्हणाले. एखादा गुन्हा सिद्ध होण्याआधीच त्याची सजा सुरू करणे हा कोणता न्याय आहे? भुजबळ साहेबांच्या अटकेनंतर पवार साहेबांविरोधात चर्चा पेरल्या गेल्या. काही जण जाणूनबुजून कारस्थान रचत होते, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.

२०१४ साली लोकांना वाटले की मोदी देश बदलणार आहेत. म्हणून लोकांनी त्यांना भरभरून मते दिली पण झाले उलटेच. आता आपली चूक सुधारण्याची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी लोकांना केले. ओबीसी विद्यार्थ्यांना सवलती देण्याचे काम आघाडी सरकारने केले. पण या सरकारची मानसिकता मनुवादी आहे. भिडे गुरूजी म्हणतात मनु श्रेष्ठ आहे, म्हणजे विचार कसे आहेत हे यातून स्पष्ट होते. हे सरकार चातुर्वर्णाचे समर्थन करणारे सरकार आहे, असे पाटील म्हणाले. याआधी दबलेल्या समाजाला वर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने काम केले मात्र हे सरकार त्याच्या उलट वागत आहे. आज अनेक समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहेत, मात्र सरकार त्यांची दखल घेत नाही. चार वर्षांत फक्त चार लाख ४६ हजार लोकांना नोकऱ्या मिळाल्या. प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. ही आकडेवारी बघून तरुण अस्वस्थ होत आहेत. तरुणांचा असंतोष बाहेर आला तर सरकारमधील लोक त्याला धार्मिक रंग देऊन मोठा वाद उभा करतील आणि चातुर्वर्ण पुन्हा आणण्याचे प्रयत्न करतील. लोकांनी यांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. ओबीसी सेल हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महत्त्वाचा घटक आहे. ओबीसी समाज सोबत असेल तरच आम्हाला यश मिळू शकते, असेही ते म्हणाले.

सांगली आणि जळगाव येथे महानगरपालिकेची निवडणूक झाली मात्र तिथे पराभव स्वीकारावा लागला, सांगलीत बंडखोरांमुळे पराभव स्वीकारवा लागला. मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले. अनेक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीत सातपेक्षा जास्त माणसे नव्हती. भाजपचा विजय हा मर्यादित झाला आहे त्यामुळे त्यांच्या गोटात ही चिंता आहे. आपल्याला जनाधार नाही असा विचार कार्यकर्त्यांनी करू नये. कार्यकर्त्यांनी नाउमेद होऊन जाऊ नये, असे आवाहन प्रदेशाध्यक्षांनी यावेळी केले.

या बैठकीला ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील-नागराळकर, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अँड.सचिन आवटे, राज राजापूरकर, प्रा.दिवाकर गमे, हिराचंद बोसुरे, दत्तात्रय घाडगे, राजु गुव्हाणे, अँड.योगेश ढमे, भानूदास शिंदे, भगवान कोळेकर, नानासाहेब राऊत, दिनकर वानखेडे, राजेंद्र पाटील, मिनाक्षी ऊंबरकर, डॉ.विलास मूर्ती, नरेश अरसडे, आदींसह प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

संबंधित लेख