राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप

09 Aug 2018 , 07:02:16 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता सेलतर्फे दोन दिवसीय राज्यस्तरीय वक्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन खंडाळा येथे करण्यात आले होते. या शिबिराची सांगता विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणाने झाली. दरम्यान, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शन केले. या शिबिरातून एक वक्ता व प्रवक्ता म्हणून उपस्थितांच्या विचारात सकारात्मकता आली असेल, अशी आशा अजित पवार यांनी व्यक्त केली. सत्ताधारी पक्ष इतर पक्षातील कार्यकर्त्यांना सामिल करून घेण्याचे राजकारण खेळत आहेत. हे भाजप सरकार निवडणुकीत जेवढा पैसा खर्च करते तेवढा पैसा इतर पक्षांनी एकत्रितपणेही केला नाही, असे ते म्हणाले. पक्ष स्थापनेनंतर पवार साहेबांनी तरुणाईला समोर आणण्याचे काम केले, याचा पक्ष वाढीला हातभार लागला. महाराष्ट्रात कित्येक वर्षे एकहाती सरकार आले नाही परंतु २००४ च्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान आपल्या पक्षाला मिळाले. शहरी भागात आपली पकड अगदीच कमी प्रमाणात आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे व तशी वाटचाल आपण केली पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले.

आजच्या परिस्थितीत कॅशलेस व्यवहार करण्यापेक्षा कास्टलेस सरकार असण्याची गरज आहे. मंत्रालयात चतुर्थ व तृतीय श्रेणीतील लोकांनी संप केला. प्रशासनावर नियंत्रण या सरकारला ठेवण्यात आले नाही. पक्षाचे प्रवक्ते म्हणून आपल्याजवळ सरकारविरोधी कित्येक प्रश्न आहेत. ते जनतेसमोर मांडण्याचे काम आपण केले पाहिजे. भाषणात बोलताना अनेक बाबींचा विचार करणे व त्या बाबी प्रत्यक्षात अमलात आणणे गरजेचे आहे. आपली भाषा, शब्द, उच्चार, समयसूचकता या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, अशा सूचना त्यांनी केल्या.

चांगला वक्ता होण्याकरिता चांगला माणूस होणे गरजेचे आहे. यासाठी वाचनाची तसेच लिखाणाची सवय असणे चांगले ठरेल. ताज्या घडामोडींची माहिती असणे गरजेचे आहे. एखाद्याशी बोलताना आदराने व संयमाने बोलणे चांगला वक्ता असल्याचे दाखवून देते. आपल्या भाषणात संतांचे दाखले आले तर ते वक्तव्य अजून प्रभावीपणे समजले जाते. त्याचसोबत वक्ता म्हणून काम करताना सामाजिक व राजकीय संदर्भ समजून घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

२०१४ ला राज्यात परिवर्तन झाले पण यादरम्यान निवडणुकीत जी लाट निर्माण झाली त्यात महाराष्ट्र वाहून गेला. परिवर्तन होण्यासाठी जी कारणे समोर आणली तीच कारणे सरकारच्या अपयशाची आहेत. मोदी सरकारला १४ वर्ष प्रयत्न करून नंतर विजयाचा झेंडा मिळाला. हे यश भूतकाळात कधीच मिळाले नाही. परंतु आजच्या काळात जी परिस्थिती आहे त्यातून हे स्पष्ट समजत आहे की भविष्यातही हे सरकार पुन्हा दिसणार नाही, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले.

मराठा व धनगर समाजाला आरक्षण देणे यावरून भाजप सरकारने राजकारण केले आहे. त्याचबरोबर इतर समाजाच्या मागण्यादेखील सरकारने पूर्ण केलेल्या नाहीत. भ्रष्टाचाराचे शिंतोडे आपल्या पक्षावर उडवले गेले. भ्रष्टाचारमुक्त देश करू, चलो चले शिवाजी के साथ असे अनेक भ्रम दाखवून २०१४ ला भाजप सरकारला यश मिळाले. भाजप सरकार आल्यावर त्यांच्या अपयशाची धोरणे कशी आहेत हे मांडण्याचे काम आपल्या वतीने पहिल्या दिवसापासून झाले. सगळ्या समाजाचा रोष या सरकारवर आहे. सामाजिक न्याय राखण्यात हे सरकार कमी पडले, अशी टीका मुंडे यांनी केली.

या सत्ताधाऱ्यांचे जवळपास १६ घोटाळे राष्ट्रवादीने समोर आणले. हे सरकार भ्रष्ट आहे हे जनतेला समजले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासने दिली. परंतु ही कर्जमाफी मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला. ही ऐतिहासिक कर्जमाफी झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. परंतु नंतर यात अनेक अटी व नियम लागू करण्यात आले. शेतकऱ्यांची जात नष्ट करण्याची भूमिका या सरकारची आहे. शेतकऱ्याला कर्जमाफीसाठी आपली लाज समोर ठेवावी लागली, हे या सरकारच्या सत्तेत घडले, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही हे सरकार अपयशी ठरले आहे. स्मार्टसिटी मधून काय मिळाले? त्याचबरोबर नागरी विकासाच्या समस्या अजूनही आहेतच. या देशात जातीयवाद निर्माण करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. राज्यात प्रत्येक विभाग संपावर गेला. यात शिक्षक वर्ग, कामगार वर्ग, शासकीय वर्ग सगळ्यांचा समावेश आहे. या वातावरणात देखील सांगली, जळगाव निवडणुकीत जनतेने सरकाच्या बाजूने मतदान केले, हे कसे झाले? याचे कारण चार वर्षांचा भ्रष्टाचाराचा पैसा निवडणुकीत वापरण्यात आला. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी पैसा ओतण्याचे काम भाजप सरकारने केले, असा आरोप पवार यांनी केला. चार वर्षांचे अपयश पुसण्याचे व राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेत आणण्याचे काम आपण चोखपणे पार पाडावे, असे आवाहन वक्ता प्रशिक्षण शिबिरात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

संबंधित लेख