आरक्षणाबाबत जनतेचा अपेक्षाभंग होण्यापूर्वी सरकारने निर्णय घ्यावा - जयंत पाटील

09 Aug 2018 , 08:07:23 PM

मराठा आरक्षणाबाबत जनतेला जे आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिले होते ते सरकार पूर्ण करू शकले नाही. जे पाऊल आधीच उचलण्याची गरज होती ते आता उचलले जात असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. मराठा समाजाने आजवर ५६ मूकमोर्चे शांततेने काढले. हा समाज आज रस्त्यावर उतरताना दिसत आहे हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असे वक्तव्य पाटील यांनी केले. सरकारने राज्यात व्यवस्था टिकवण्यासाठी अनेक खोटी आश्वासने देऊन नंतर वेळ मारण्याचे काम करू नये, अशी कानउघाडणी त्यांनी केली. आजच्या महाराष्ट्र बंदला सर्व समाजाचा पाठिंबा आहे. मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याची विनंती जयंत पाटील यांनी केली.

सरकारने आश्वासन पूर्ण करण्यासाठी काही पावले टाकण्याची गरज होती. झोपलेल्या सरकारला जागे करण्याचे काम मागच्या १०-१५ दिवसात आंदोलनातून झाले. आत्मबलिदान करण्यापर्यंत हे आंदोलन गेले आहे. तरीही जुलै महिन्यात घडलेल्या घटनेवर नोव्हेंबरमध्ये निर्णय देऊ असे उत्तर सरकारकडून दिले जात असल्याची टीका त्यांनी केली. यावर सरकारचा वेळकाढूपणा स्पष्ट होत असल्याचा टोला त्यांनी लगावला. देशातील अनेक समाजाला दिलेली आश्वासने नाईलाजाने का होईना पूर्ण करण्याची भूमिका सरकारने घ्यावी, जनतेचा अपेक्षाभंग होण्यापूर्वी निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित लेख