सनातन संस्था दहशतवादी कारवाया करत आहे हे स्पष्ट झाले – नवाब मलिक

10 Aug 2018 , 11:04:30 PM

महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा येथून सनातनचा साधक वैभव राऊतला अटक केली असून त्याच्या घरात बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्यही सापडले आहे. सनातनाच्या एका साधकाकडे अशा पध्दतीने बॉम्ब सापडणे यामुळे मालेगावच्या घटनेची आवृत्ती असल्याचे सिध्द होत आहे. एखादा अल्पसंख्यांक अश्या बॉम्बसहीत सापडला तर त्याला पाकिस्तानशी, एलटीटीशी जोडले गेले असते, असे मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. या प्रकरणाची सरकारने खोलात जाऊन माहिती मिळवणे गरजेच आहे. कलबुर्गी, पानसरे यांचे मारेकरी पकडण्यात सरकारला अपयश आले. मात्र यात सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे. सरकार प्रामाणिक असेल तर पोलिस यंत्रणा याचा शोध घेऊ शकते. मालेगावच्या स्फोटानंतर करकरेंनी त्याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला पण त्यावर नंतर पाणी फिरवण्यात आले, तसे याबाबतीत होऊ नये, असे जयंत पाटील म्हणाले.

या घटनेवरुन ही संस्था पूर्णपणे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे, हे स्पष्ट होते, असे मत मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले. आम्ही वेळोवेळी या संस्थेवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. मात्र यांना गोवा व महाराष्ट्र सरकारचा राजाश्रय आहे. या लोकांना किती जणांचा जीव घ्यायचा आहे, असा प्रश्न उपस्थित करत असतानाच सरकारने आता हा विषय गांभार्याने घ्यावा व या संस्थेवर तात्काळ बंदी आणावी, अशी मागणी मलिक यांनी केली.

देशप्रेमाचे सर्टिफिकेट घेऊन जन्मणाऱ्या मंडळींकडे बॉम्ब सापडणे म्हणजे कदाचित दिवाळीची पूर्वतयारी असावी, असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. या लोकांचे हात कलबुर्गी, गौरी लंकेश आणि गिरीश कर्नाडपर्यंत पोहोचतात मात्र ते हात आम्हाला दिसत नाहीत. मिरजेतील दंगलीनंतर सनातनवर बंदी घालण्याची मागणी करणारा मी पहिला माणूस होतो आणि आजही आपण या मागणीवर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख