नवाब मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे आंदोलन; मनुस्मृतीचे केले दहन

13 Aug 2018 , 08:26:01 PM

दिल्लीत ९ ऑगस्ट रोजी जंतरमंतर येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाचे दहन केले. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि उपाध्यक्ष नवाब मलिक यांच्या नेतृत्वात आज आंबेडकर गार्डन, चेंबूर येथे आंदोलन करण्यात आले. हे कृत्य करणाऱ्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी मलिक यांनी केली. या आंदोलनादरम्यान मनुस्मृतीच्या प्रती जाळण्यात आल्या.

देशाचे संविधान नागरिकांना आपले हक्क देते. अशी ही देशाची घटना जाळली जात आहे ही गंभीर बाब आहे. हा देशाचा अपमान आहे, असे मत मलिक यांनी मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतही अपशब्द वापरले गेले. आम्ही बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान कधीही सहन करणार नाही, असा इशारा मलिक यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विरोधात राज्यभर आंदोलन करेल, असे सांगतानाच घटना जाळणाऱ्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, अन्यथा आंदोलने थांबणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनील शिंदे, पक्षाचे नेते शिवाजीराव नलावडे, रविंद्र पवार आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख