राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

16 Aug 2018 , 08:24:15 PM

आज भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त दीर्घ काळानंतर छगन भुजबळसाहेब कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे प्रदेशाध्यक्षांनी सर्वांच्या वतीने स्वागत केले.

भारताला स्वातंत्र्य मिळानंतर गेली अनेक वर्ष आपण देशाच्या प्रगतीचा विचार करत होतो पण अचानक गेली ३-४ वर्ष या प्रगतीवर लोकांच्या मनात शंका निर्माण होताना दिसते आहे. आजही वर्तमानपत्र बघताना असेच मनात येते की आमच्या प्रयत्नांचे पुढचे पाऊल पडेल हा विश्वास होता पण असे होताना दिसत नाही, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. एखाद्या बँकेचे पैसे सायबर क्राईम करून उडून जातात. देशाच्या निवडणुका एकाच वेळेस घेण्याबाबत काही घटकांमध्ये शंका निर्माण होतात. या देशाची व्यवस्था भविष्य काळाकडे बघत असताना देशाचा रुपया ७० रुपयांवर जातो. या देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण स्वातंत्र्य मिळवले त्याचा फायदा देशातील गोरगरिबांना झाला पाहिजे. त्यामुळे मागच्या ३-४ वर्षात सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन पुढे जाणारा भारत पुन्हा एकदा मागे वळतो की काय ही शंका सर्व समाजात पसरली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हा ४ वर्षाचा कालखंड अतिशय उत्साहाने कोणाच्या तरी हातात दिलेला पण यावर आता प्रश्नचिन्ह तयार झाले आहे. या देशातील लोकशाही इतकी बळकट आहे की देशावर आलेल्या संकटाला दूर करण्याची ताकद त्यांच्यात आहे. भारतीय जनता ही देशातील कोणत्याही नेत्यापेक्षा देशाला अधिक चांगली दिशा देणारी जनता आहे. त्यामुळे आजच्या स्वातंत्र्यदिनी सामान्य माणसाच्या मनातला भारत तयार करण्याची ताकद आपल्यात येवो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. देशाच्या आर्थिक-सामाजिक क्षेत्रात प्रगती करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली आपण अनेक वर्ष राबवली आहे. आ. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देशाची प्रगती करण्याचे काम आपण केलेले आहे. पुढचे पाऊल टाकण्याची ताकद आपल्याला लाभो. असे म्हणत जयंत पाटील यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला उपाध्यक्ष व मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, आ. छगन भुजबळ, आ. विद्या चव्हाण, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, सेवादल अध्यक्ष दिपक मानकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख