शिवसेना भाजपच्या पाठी फरफटत गेली म्हणून भद्रावतीचा विकास झाला नाही - जयंत पाटील

18 Aug 2018 , 05:41:33 PM

अटलबिहारी वाजपेयी अजातशत्रू होते. ते कमी शब्दात आपले म्हणणे मांडायचे. उत्तम विरोधी पक्ष नेते होते. कुशल पंतप्रधान होते. साम दंड भेदाचा वापर करायचा आणि आपली खुर्ची टिकवायची हे अटलजींनी कधी केले नाही, सत्तेचे दुरुपयोग करून त्यांनी कधी कुणाला हैराण केले नाही. भाजपने त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला हव्यात, असे मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी भद्रावती नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना व्यक्त केले.

चार वर्षात या सरकारने काहीच केले नाही. शिवसेनेला तर चार वर्षांत आपली भूमिकाच ठरवता आली नाही. शिवसेना भाजपच्या पाठी फरफटत गेली म्हणून भद्रावतीचा विकास त्यांना करता आला नाही. शिवसेनेने जर आधीच जरब बसवली असती तर भद्रावतीला आपला हक्क मिळाला असता, असे ते म्हणाले. आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की लोक भाजपला मतदान देणार नाहीत. सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. लोकांच्या मनात मोदींविषयी एक प्रश्न निर्माण झाला आहे. पंतप्रधान आणखी किती फसवणार? गुगलवर फेकू टाईप केल्यास गुगलही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवतं, असा टोला त्यांनी लगावला.

भाजपने प्रचंड महागाई वाढवून ठेवली आहे. आम्ही जर २०१९ ला सत्तेत आलो तर हेच सिलिंडर पुन्हा ४०० रुपयांवर आणू. आमचं सरकारंच गरिबांसाठी होतं. लोकांना रेशनवर आज अन्न धान्य मिळत नाही यावर सरकारमधील लोक काहीच बोलत नाहीत, असे जयंत पाटील म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडवला, नोटाबंदी करून गरिबांना हैराण केले, जीएसटी आणून व्यापाऱ्यांना परेशान केले म्हणून आमची नाराजी आहे, असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांचा डोळा आता मुंबईवर आहे. विदर्भाकडे सरकारचे लक्ष नाही असा आमचा आरोप आहे. विदर्भात एकही नवा उद्योग या सरकारने आणले नाही. सरकारकडे कोणत्याही गोष्टीत 'नाहीच' आहे. भद्रावतीसाठी निधी मिळाला का, नाही ? निधी येणार का? माहिती नाही, प्रकल्प येणार आहेत का? नाही. या सरकारलाच आता नाही म्हणण्याची वेळ आली आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही पण शरद पवार यांच्यावर टीका करतात. पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय प्रसिद्ध मिळत नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी पवारांवर टीका केली. पवारांबाबत खालच्या पातळीवर जाऊन टीका करून उद्धव ठाकरे यांनी त्यांची पातळी सिद्ध केली. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला खड्यासारखे बाजूला करा, असे आवाहन त्यांनी केले.

याआधी कधी देशात संविधानाचा अपमान झाला नाही, संविधान जाळले गेले नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपशब्द वापरले गेले नाहीत पण या सरकारच्या काळात हे सर्व घडत आहे. जे लोक संविधानाचा सन्मान करत नाही त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही. संविधान धोक्यात आले आहे म्हणून या निवडणुकांमध्ये जातीयवादी आणि धर्मांध लोकांना धडा शिकवायला हवा, असे आवाहन आमदार प्रकाश गजभिये यांनी केले. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना भद्रावतीबाबत काडीचीही माहिती नाही. त्यामुळे आपण भद्रावती चांगल्या आणि जाणकार लोकांच्या हाती द्यायला हवी, असेही ते म्हणाले. देशात कोणते राज्य सुरू आहे तेच कळत नाही, भिडे गुरुजी मनुस्मृतीचा पुरस्कार करत आहेत, रोहित वेमुलासारख्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागत आहे, दलितांवर अत्याचार होत आहे हे का घडतंय? तुम्हाला मनुचे राज्य हवे की फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे राज्य हवे आहे ते ठरवण्याची आता वेळ आली आहे, असे गजभिये म्हणाले.

माजी मंत्री अनिल देशमुख यांनी या सरकारच्या काळात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली नाही उलट मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरी करू नये. शेतकऱ्यांना मुलांनी प्रगती करू नये असे मुख्यमंत्र्यांना वाटत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.

भद्रावती नगर पालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आली तर सरकार आल्यास भद्रावतीकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार साळुंके गुरूजी, जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) चे हरीश दुर्योधन व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख