राष्ट्रवादी कनेक्ट दौऱ्यांतर्गत ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आढावा बैठक

18 Aug 2018 , 06:49:46 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी कनेक्ट दौऱ्यांतर्गत ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वागणे हुकूमशाही पद्धतीचे आहे म्हणून सर्व विरोधी पक्षांचे एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साम, दाम, दंड, भेद या सर्व गोष्टींचा वापर करून कारभार रेटला जात आहे, असे म्हणाले. मागच्या चार वर्षांत नरेंद्र मोदी यांनी लोकांची फसवणूक केली आहे. आंध्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक सर्वच राज्यात लोक नाराज आहे. लोक आपली नाराजी रस्त्यावर येऊन दाखवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फक्त आपला बुलेट ट्रेनचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे. बुलेट ट्रेनवर खर्च केले जाणारे पैसे जर भारतीय रेलवर केले तर बरे झाले असते, असे ते म्हणाले.

भाजपने २ जी स्कॅमच्या घोटाळ्याचा प्रचार केला. कोळसा घोटाळ्याचा प्रचार केला. सर्वोच्च न्यायालयाने २ जी स्कॅममधील सर्वांना निर्दोष घोषित केले. सरकारकडे पाच वर्ष होती पण चार वर्षांत कोळसा घोटाळ्याबाबत एक शब्द ही सरकारने उच्चारला नाही. या सरकारच्या काळात सर्वात मोठा राफेल घोटाळा झाला. दुप्पट भावाने विमाने खरेदी केली गेली. निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने हा घोटाळा केला. ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणारेही घोटाळा करतात यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईत जमीन घोटाळा केला. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला मात्र मुख्यमंत्र्यांनी सर्वांना क्लीनचिट दिली. विदर्भातील अनेक जलसिंचन प्रकल्पात महाराष्ट्र सरकारने कोणतीही सुधारणा केली नाही. एमआयडीसी परिसरात नवे उद्योग आणले नाही. दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याची घोषणा मोदींनी केली होती. मुख्यमंत्र्यांना विचारा किती लोकांना रोजगार दिला. उत्तर समाधानकारक नसेल म्हणून या लोकांना आता घरी बसवणे गरजेचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

ओबीसी समाजाला मागे टाकण्याचे काम या सरकारने केले. ओबीसी नेते छगन भुजबळ यांना जाणूनबुजून गुन्हा सिद्ध झाला नाही तरी तुरुंगात डांबण्यात आले. द्वेषापायी हे सर्व केले, असा आरोप त्यांनी केला. सर्वत्र आरक्षणाची मागणी होत आहे. जाट, पटेल, मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. सरकार त्यावर अजूनही काही भूमिका घेत नाही त्यामुळे अशी भीती आहे की नरेंद्र मोदी येत्या लोकसभा निवडणुकासाठी सर्वच आरक्षण रद्द करतील की काय? म्हणून पवारांनी संविधान बचाव मोहीम हाती घेतली. संविधानाचे मूल्य वाचवण्यासाठी या सरकारला पायउतार करावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

या ठिकाणी बोलताना आमदार प्रकाश गजभिये यांनी सांगितले की भाजपचे दोन खासदार या भागात आहेत. वित्तमंत्री देखील या भागाचे आहेत, मुख्यमंत्र्यांचा जन्म जवळच्या गावचा आहे. महत्त्वाची पदे या ठिकाणी आहेत पण या भागाचा काही विकास झाला नाही. चंद्रपूर अस्वच्छतेमध्ये प्रथम आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात १३ कोटी रुपये रस्त्यांसाठी दिले, कुठे आहेत रस्ते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र हे पावन क्षेत्र आहे. दादासाहेब खोब्रागडे ज्यांनी तांदळाच्या विविध पिकांचे संशोधन केले ते याच भागाचे आहेत. नुकतेच दादासाहेबांचे निधन झाले सरकारने त्यांच्या कुटुंबीयांना काय दिले, असेही त्यांनी विचारले. हे सरकार जातीयवादी लोकांना पाठिशी घालत आहे. संभाजी भिडे समाजात विष पेरण्याचे काम आपल्या वक्तव्याच्या माध्यमातून करत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी सरकार काहीच हालचाल करत नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

या बैठकीस जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख