नरेंद्र मोदी यांच्या सरकारची प्रतिमा स्वच्छ राहिलेली नाही - जयंत पाटील

20 Aug 2018 , 06:19:23 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी कनेक्ट विदर्भ दौऱ्यास १६ ऑगस्टपासून सुरुवात झाली. गोंदिया येथे प्रदेशाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली. तत्पूर्वी एनएमटी कॉलेज येथे सेवादलातर्फे जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विदर्भात जिथे राष्ट्रवादी ताकदवान आहे, इथे चांगला प्रतिसाद मिळाला. अहेरी, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरचे काही भाग अशा विविध भागात राष्ट्रवादीला चांगली ताकद आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संपूर्ण राज्याप्रमाणे या भागातही अनेक अडचणी जाणवल्या. या भागात धान पिकाला भाव मिळत नाही. आघाडी सरकारने धान पिकांच्या शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर केले होते. हे सरकार तसं काही करताना दिसत नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन हमीभावाची घोषणा करतात मात्र त्याचे पुढे काहीच होत नाही, शेवटी त्या घोषणा फक्त जुमलेबाजी ठरतात. हे सरकार जुमलेबाजी करण्यात माहीर आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेस, शेकाप आणि समविचारी पक्षांना एकत्र घेऊन २०१९च्या निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याबाबत विविध पातळीवर चर्चाही सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. लवकर निवडणुका झाल्या तर त्याचा फटका भाजपला बसणार. देशात नाराजी आहे. सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. आरक्षणाबाबत अनेक समाजात रोष आहे. २०१४ साली लोकांना एक आशा वाटत होती पण आता लोकांना फक्त निराशा वाटत आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वात मोठा राफेल घोटाळा झाला. त्यामुळे लोकांच्या मनात नरेंद्र मोदी यांच्या सरकारची प्रतिमा स्वच्छ राहिलेली नाही. अमेरिकेसारख्या देशात ईव्हीएमचा वापर केला जात नाही. इथे लोकांचे मोबाईल हॅक होतात तिथे लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत शंका आहेच, असेही ते म्हणाले.

संबंधित लेख