राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुथ कमिटी ताकदवान करणार - जयंत पाटील

20 Aug 2018 , 06:51:21 PM

भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कनेक्ट दौऱ्यांतर्गत कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर कडाडून टीका केली. मागच्या चार वर्षात या सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतले. सरकारच्या चुकीमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वेळोवेळी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवला. सरकारला जाब विचारला. आता हा लढा शेवटच्या टप्यात येऊन पोहोचला आहे. कारण सरकारची परिस्थिती काही नीट वाटत नाही. सरकारवर लोक प्रचंड नाराज आहेत. म्हणून पुन्हा भाजपला लोक मतदान करतील असं वाटत नाही. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आपली बुथ कमिटी ताकदवान करावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू हे पाकिस्तानात गेले म्हणून त्यांच्यावर टीका होत आहे. सिद्धू यांना आमंत्रण तरी होतं पण पंतप्रधान नरेंद्र मोदी तर बिन बुलाये मेहमान म्हणून पाकिस्तानात गेले होते. पाकिस्तानात उतरले, शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाल्ला मग सिद्धूवर का टीका करत आहात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

देशात कधी घडले नाही असा घटना जाळण्याचा प्रयत्न झाला. सरकारने एकालाही अटक केली नाही कारण हे त्यांचेच बगलबच्चे होते. हे सरकार खडा टाकून बघतं लोकांमध्ये त्याची प्रतिक्रिया काय उमटते हे पाहिले जाते आणि मग मोठा कार्यक्रम केला जातो. जनतेने यांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. हल्ली विरोधीपक्ष नेत्याच्या बातम्या काही छापल्या जात नाही. खरे बोलणाऱ्या पत्रकारांनीही घरी बसवले जात आहे. एबीपीचे पत्रकाराने सरकारची पोलखोल केली म्हणून त्यांना घरी बसविण्यात आले. हे सरकार अघोषित आणीबाणी आणत आहे, असे ते म्हणाले.

प्रफुल्ल पटेल हे काही योजना या भागात आणू पाहत आहेत मात्र सरकार त्यात अडथळा निर्माण करत आहे. अनेक जलसिंचन प्रकल्प प्रलंबित आहेत. सरकारने एकही प्रकल्प अद्याप आणला नाही. या सरकारला विकास करता येत नाही. मुख्यमंत्र्यांना तर नागपुरमधली गुन्हेगारी कमी करता येत नाही. राज्यातील गुन्हेगारीही वाढली आहे. सरकारच्या या सगळ्या गोष्टी आपण बाहेर आणायला हव्यात, असे जयंत पाटील म्हणाले.

सनातनचा साधक वैभव राऊत याला अटक करण्यात आली. या वैभवसाठी मोर्चे काढले गेले. आसिफा या चिमुरडीवर बलात्कार झाला. तिच्या आरोपींना अटक झाली होती. या अटकेतील आरोपींना सोडण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. याने स्पष्ट होते की भाजप आता अटलजींच्या नेतृत्वातील भाजप राहिलला नाही. तो मोदींचा भाजप झाला आहे. ज्यांच्या मनात गरीब जनतेसाठी नाही तर तुरुगांतील आरोपींसाठी संवेदना आहे. म्हणून लोक भाजपला वैतागले आहेत, असे ते म्हणाले.

खासदार मधुकर कुकडे यावेळी म्हणाले की भंडारा येथे अनेक समस्या आहेत. या समस्यांना वाचा फोडण्याचे काम आम्ही करत आहोत. प्रत्येक भागाचा न थकता आम्ही दौरा करत आहोत. आमच्या मेहनतीचे चीज येणाऱ्या निवडणुकांमध्ये होईल याची मला खात्री आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच झेंडा फडकेल याचा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले.

माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले की मधल्या काळात लोकसभा पोटनिवडणूक झाली. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले त्यामुळे हे शक्य झाले. पण यात बुथ कमिट्यांचाही फायदा झाला. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये बुथ कमिट्या आणखी ताकदवान कराव्या लागतील.

यावेळी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुधे आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख