मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात महिलांच्या मुलभूत सुविधांकडे दुर्लक्षच- अदिती नलावडे

05 Feb 2016 , 04:40:24 PM

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईच्या यंदाच्या ३७ हजार ५२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात महिलांच्या मुलभूत सुविधांकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. एकीकडे 'स्वच्छ भारत' अभियानांतर्गत सामूदायिक शौचालये बांधण्यासाठी ७५ कोटींची भक्कम तरतूद करताना दुसरीकडे महामार्गांवरील महिलांच्या शौचालयांसाठी फक्त पाच कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने केली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मुंबई विभागीय संघटक अदिती नलावडे यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतल्या युवतींनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर आज सकाळी प्रतिकात्मक मूक आंदोलन केले. महिलांच्या इतक्या मुलभूत प्रश्नांबाबत महानगरपालिका प्रशासन हेळसांड करत आहे. त्याबाबत मूक आंदोलन करून युवतींनी आपला निषेध नोंदवला. 

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मागण्या-
यावेळी शौचालयांसाठी मंजूर झालेल्या रकमेत वाढीव तरतूद करावी, 
वाढीव तरतूद केलेला निधी हा विहित कालावधीत नियोजित कामासाठी खर्च करण्यात व्हावा, 
या सर्व कामावर लक्ष ठेवण्याकरिता नगरसेवकांची समिती असावी. 
या समितीत महिला आणि युवती संघटनांचा समावेश असावा
प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेतली जावी
या व अशा विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने लवकरच महापालिकेचे आयुक्त, स्थायी समिती आणि महापौरांना सादर करणार असल्याचे अदिती नलावडे यांनी आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. याप्रकरणी लक्ष घालून महानगरपालिका प्रशासन योग्य ती कार्यवाही करावी, अशी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची आग्रही भूमिका आहे. 

संबंधित लेख