केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक कोटी रूपयांचा धनादेश केला सुपूर्द

22 Aug 2018 , 06:54:51 PM

गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये महाप्रलय आल्याने तेथील नागरी जीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केरळवर मोठे नैसर्गिक संकटच आले आहे. देशभरातून मदतीचा ओघ केरळकडे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून केरळ सरकारला एक कोटी रूपयांची मदत देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे केरळ राज्याचे सरचिटणीस सलिल मॅथ्यू यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. हा धनादेश पक्षाचे केरळचे प्रदेशाध्यक्ष थॉमस चॅंडी यांच्याकडे देण्यात येईल. त्यांच्यामार्फत केरळच्या मुख्यमंत्र्यांना ही मदत सुपूर्द करण्यात येईल. आर्थिक मदतीसह इतर साहित्याबाबतही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मदत केली जाईल. पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या आणि पक्षाच्या माध्यमातून केरळ राज्यासाठी लागणारी औषधे आणि साहित्याची मदतही देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. केरळमध्ये आलेला महाभयंकर प्रलय हा राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावा. केंद्र सरकारने यासाठी केलेली मदत तोकडी पडत आहे, त्यामुळे सरकारने मदत वाढवून द्यावी अशी पक्षाची मागणी असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, कोषाध्यक्ष हेमंत टकले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

संबंधित लेख