राष्ट्रवादी भवन येथे पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न

22 Aug 2018 , 07:50:13 PM

मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष जयदेव गायकवाड, आमदार प्रकाश गजभिये, विभाग समन्वयक व सरचिटणीस बसवराज नागराळकर पाटील व संपूर्ण राज्यातील सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्षांचा भारतीय संविधान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यात सरकारविरोधात सामाजिक प्रबोधनात्मक मेळावे व शिबीरे घेण्याची गरज आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन आपली संघटना बळकट करणे गरजेचे आहे, असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेली देशाची घटना जाळणाऱ्या गुन्हेगारांना अटक होत नाही याचा अर्थ ही कृती विचारपूर्वक करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेत आल्यावर घटना बदलायची हे भाजपच्या मनातच होते. मूळ आरक्षणाला धक्का लावण्याचे काम भाजप करत आहे. संभाजी भिडे यांचे वक्तव्य म्हणजे तळ्यात टाकलेला दगड आहे, यावर सरकारचा पुढचा कार्यभाग ठरवला जाईल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका लोकांपुढे मांडण्याची गरज आहे. आपल्या विभागामार्फत सामाजिक संकट दूर करण्यासाठी बैठक घ्यावी व पक्षसंघटना बळकट करावी. यासाठी बूथ कमिटीचा वापर करा, असा सल्ला पाटील यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वर्ग जर आपण एकत्र केला तर विजय आपलाच आहे. आपल्या विभागातून जास्त प्रमाणात वक्ते तयार करा त्यांचा उपयोग समाज प्रबोधनासाठी करू शकतो, असेही ते म्हणाले.

संबंधित लेख