नाशिकमधील 'संविधान बचाव, देश बचाव' कार्यक्रमात मनुवादी वृत्तीचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

24 Aug 2018 , 06:04:05 PM

संविधानिक मुद्द्यांना हरताळ फासण्याचे काम सध्या देशात होत आहे. देशात हुकूमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून सरकार विरोधी भूमिका घेतल्याने अनेक पत्रकारांना नोकरी गमवावी लागत आहे. त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आले असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी महिला काँग्रसेच्या 'संविधान बचाव, देश बचाव' मोहिमेअंतर्गत नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सद्यस्थितीत घडत असलेल्या संविधान विरोधी अनेक घटनांवर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, “समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली. महिलांना व्यवस्थेत आरक्षण देण्याचे काम माननीय शरद पवार साहेबांनी केले. मात्र आरक्षणावर गदा आणण्याचे काम सरकारकडून होत आहे. दिल्लीत संविधान जाळण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. मात्र अशा समाजकंटकांवर कोणतीही कारवाई होत नाही, ही खेदाची बाब आहे. देशात अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी प्रयत्न होत असताना मनुवादी लोकांकडून अंधश्रद्धा पसरविण्याचे काम केले जात आहे. सनातनच्या लोकांकडे बॉम्ब सापडले, त्यांनी कुणाच्या हत्येचा कट रचला होता त्याची माहिती पत्रकारांसमोर खुली करण्यात यावी.“ कुठलेही आरोप सिद्ध झाले नसताना भाजप सरकारने छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबून ठेवण्याचे पाप केले. सत्ता टिकविण्यासाठी सत्तेचा वापर या सरकारतर्फे केला जात असल्याची टीका पाटील यांनी यावेळी केली. भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी सर्व समाजघटकांनी संघटित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी यावेळी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांच्यासह बागलाण तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि खड्डे अपघातात मरण पावलेल्या युवकाला श्रद्धांजली अर्पण केली. मनुस्मृती मध्ये पददलित आणि महिलांवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात महात्मा फुले यांनी आवाज उठविला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुलेंना गुरू मानून मनुस्मृती नष्ट करून संविधानाची निर्मिती केली. देशात सध्या मात्र जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, पण आम्ही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी असून त्यांचे विचार रुजविण्यासाठी सतत प्रयत्न करत राहू, अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली. याआधी देशात विरोधी पक्षांचा सन्मान राखला जात होता. मात्र सध्याचे सरकार विरोधी पक्षांचा सन्मान न करता त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली. देशातील चुकीच्या आयात-निर्यात धोरणांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. देशात साखरेचे मुबलक उत्पादन होत असताना पाकिस्तानातून साखर आयात केली जातेय. शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव वाढला की लगेच निर्यात बंद करण्याचे चुकीचे धोरण सरकार राबवत असल्याची टीका त्यांनी केली. संविधानात व्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे मात्र संविधानातील ही तत्त्वे मोडीत काढली जात आहेत. मनुस्मृती जाळली म्हणून महिलांवर गुन्हे दाखल केले जातात, मात्र संविधान जाळणाऱ्यांविरोधात कुठलाही गुन्हा दाखल होत नाह, ही खेदाची बाब असल्याचे भुजबळ म्हणाले. सरकारकडून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण केली जात असल्याचे सागतानाच जातीवादी कारवाया करणाऱ्या सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी त्यांनी केली.

घटना पायदळी तुडविण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. जगात नव्याने निर्माण होणारे देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाचा अभ्यास करतात. या संविधानाने भारत देश एकसंध बांधला गेला आहे. त्यामुळे ही घटना वाचवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. घटनेला हात लावाल तर तुमचे हात जळून खाक होतील, असा इशारा त्यांनी दिला. ईव्हीएम मशीन मते खाण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे मनुस्मृती बरोबरच ईव्हीएमची होळी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान म्हणाल्या की, देश उभा करण्यासाठी माणसाला माणसांसोबत जोडणे आवश्यक आहे. हे माणसांना एकसंध ठेवण्याचे काम संविधान करते. संविधानाने ते अधिकार आपल्याला दिले आहेत. मात्र सध्याच्या व्यवस्थेत समाजासमाजात द्वेष पसरविला जात असून माणसांना एकमेकांपासून तोडण्याचे काम होत आहे. या पद्धतीने सरकारचे काम चालले तर संविधान धोक्यात येईल. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता देखील धोक्यात आली आहे. त्यामुळे देश टिकण्यासाठी बंधुतेची गरज असल्याची भावना खान यांनी व्यक्त केली. देशात ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यास राष्ट्रवादीचा विरोध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी म्हणाले की, धर्माच्या नावाने चालणारी व्यवस्था उलथण्याचे आव्हान आपल्यासमोर उभे राहिले असून ते आव्हान स्वीकारणे ही आपली जबाबदारी आहे. भारतीय लोकशाहीचा संविधान हा प्राण आहे, त्यामुळे संविधान टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन त्यांनी केले.

संपूर्ण देशात महिला व लहान मुलींवरील अत्याचार वाढले आहेत. शेतकरी शेतमालाला भाव नाही म्हणून शेतकरी आपला माल रस्त्यावर फेकतो आहे. असे महत्त्वाचे विषय समोर असताना संसदेच्या बाहेर संविधान जाळले जाते, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे, असे वक्तव्य आमदार विद्या चव्हाण यांनी केले. सरकारकडून विकासकामे बाजूला ठेवून सूड बुद्धीने कारवाई केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच महिला व मुलींवर होणारे अत्याचार खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी मेरा संविधान ही नृत्य-नाटिका सादर करण्यात आली तसेच संविधानावरील माहितीपट दाखविण्यात आला. संविधान बचाव-देश बचाव, महिलांवरील वाढते अत्याचार, महिला आरक्षण, सातबारा, शेतकरी आत्महत्या याबाबत विविध पक्षांतर्गत ठराव संमत करण्यात आले. महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे व शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी प्रास्ताविक आणि माजी आमदार उषा दराडे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हेमंत टकले, आ. विद्या चव्हाण, आ. दीपिका चव्हाण, आ.नरहरी झिरवाळ,माजी आमदार जयवंतराव जाधव, अॅड.जयदेव गायकवाड, उषा दराडे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी अरुण गुजराथी, ईश्वर बाळबुधे, विश्वास ठाकूर, श्रीराम शेटे,गफार मलिक, अजिंक्य राणा पाटील, सक्षणा सलगर, दिलीप खैरे, नानासाहेब महाले, अर्जुन टिळे, डॉ.भारती पवार, संदीप गुळवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, जळगावच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, नंदुरबारच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती हेमलता, धुळ्याच्या जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष राजश्री घुले पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे,नगरसेविका सुषमा पगारे, समीना मेमन, गजानन शेलार, माजी नगरसेविका कविता कर्डक, सुनीता निमसे, महिला पदाधिकारी मंगला पाटील, सुवर्णा शिंदे, रेश्मा आहिर, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख