वसतीगृहांच्या अपुऱ्या सुविधेमुळे शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची परवड

24 Aug 2018 , 11:45:49 PM

वसतीगृहांच्या कमी संख्या, अपुऱ्या सुविधांमुळे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची परवड होत असल्याची बाब समोर येत आहे. योग्य सुविधा नसल्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून या विद्यार्थ्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संचालक अभय वाघ आणि सहसंचालक प्रमोद नाईक यांची भेट घेतली आहे.
 
या विषयावर बोलताना अमोल मातेले म्हणाले की, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येत असतात, त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात राहण्याची वेळ येते. मात्र सध्याच्या घडीला वसतिगृहाची संख्या अपुरी आहे, जे वसतिगृह आहेत त्या वसतिगृहांची दुर्दशा आहे, अनेकांची पडझड झाली आहे. पाण्याची व्यवस्था नाही, जेवणाची व्यवस्था नाही, अशात विद्यार्थ्यांनी राहायचे कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य़ स्वाती देशपांडे यांनी निलंबित केले आहे. विद्यार्थांचे हे निलंबनही नियमांना डावलून केले असल्याचे अमोल मातेले यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्याचे निलंबन म्हणजे त्यांच्या आयुष्याशी खेळ केला जात आहे असा आरोपही त्यांनी केलाय. वसतीगृहांचा प्रश्न तसेच विद्यार्थ्यांचे इतर महत्त्वांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी एक निवेदनाद्वारे केली आहे. 

संबंधित लेख