महापालिका प्रशासन मृतांच्या नातेवाईकांच्या भावनांशी खेळत आहे – सचिन अहिर

27 Aug 2018 , 07:07:57 PM

मुंबई महानगरपालिकेच्या इस्पितळात शवविच्छेदनासाठी सफाई कामगारांचा वापर केला जात असल्याची बाब आर. टी. आय. च्या माध्यमातून बाहेर आली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, असे म्हणत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन अहिर  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला. यासंदर्भात उच्च न्यायालयाकडे जनहित याचिका दाखल केली आहे. याकरिता पक्षाच्या गटनेत्या राखी जाधव यांच्या माध्यमातून महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रश्न मांडण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेच्या अशा अनेक घटना नियमबाह्य आहेतच, परंतु सामाजिक दृष्टिकोनातूनही याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शवागारातील ही घटना अत्यंत गंभीर असून काही दिवसांपूर्वी सायनमधील लोकमान्य टिळक रुग्णालयातील शवागार बंद होते. त्यामुळे एकेका शवविच्छेदनासाठी एक ते तीन दिवस एवढा अवधी लागत होता. परंतु आता हेच शवविच्छेदन २४ तास सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. पण त्यामध्ये प्रशिक्षित डॉक्टरांकडून मृतदेहाचं शवविच्छेदन न करता ते सफाई कामगारांकडून करुन घेतलं जातंय, ही गोष्ट न पटणारी आहे, असे मत राखी जाधव यांनी व्यक्त केले आहे. कोणत्याही माणसाचा मृत्यू झाल्यानंतरही त्या मृतदेहामध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या, नातेवाईकांच्या भावना अडकलेल्या असतात. त्यामुळे एकप्रकारे कामगारांकडून मृतदेह शिवून घेत महापालिका प्रशासन, मृतांच्या नातेवाईकांच्या भावनांशी खेळत आहे. ही बाब गंभीर असून महापालिका प्रशासनाला प्रशिक्षित डॉक्टरांकडून तसेच शवागार सेवकांकडूनच मृतदेहाचं शास्त्रोक्तपणे विच्छेदन करायला द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित लेख