इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनोखे आंदोलन, नागरिकांना कमळाचे काळे फूल देत केला निषेध

28 Aug 2018 , 08:43:28 PM

सतत इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसच्या वतीने मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना कमळाचे काळे फूल देऊन सरकारचा निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीमध्ये 'विक्रमी' कामगिरी केली असून पेट्रोलच्या दर कमालीचे वाढले आहेत. पेट्रोल प्रतिलिटर ८५ रुपयांवर गेले आहे, तर डिझेलचा भडका ७३ रुपये प्रतिलिटरवर पोहचला आहे. मुंबईसारख्या शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला असून पेट्रोल-डिझेलच्या या दरवाढीचा थेट फटका जनतेला बसत असल्याने या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.  

या आंदोलनाबाबत बोलताना माजी मंत्री सचिन अहिर म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ करून सरकारने मुंबईकरांवर महागाईचा आणखी एक मोठा बोजा टाकला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच जनतेला हा त्रास सहन करावा लागत आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर थोडे कमी झाले होते तेव्हा भाजपने त्याची मोठी जाहिरातबाजी केली होती, मात्र आज दरांनी उच्चांक गाठला आहे त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. सरकारमधील लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनाही आम्ही कमळाचे काळे फूल पाठवणार आहोत असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रवक्ते क्लाईड क्रास्टो , मुंबई युवती अध्यक्ष अदिती नलावडे, जिल्हाध्यक्ष बबन कनावजे, तालुकाध्यक्ष रवी मयेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख