आपत्तीग्रस्त केरळसाठी केंद्राने परराष्ट्रांची मदत स्वीकारावी, खा. शरद पवार यांची केंद्र सरकारला सूचना

30 Aug 2018 , 07:03:43 PM

केरळातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संयुक्त अरब अमिरातीने दिलेली ७०० कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारने नाकारली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपत्तीग्रस्त केरळसाठी केंद्र सरकारने परराष्ट्रांची मदत स्वीकारावी, अशी सूचना केली आहे. दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारी आकडेवारीनुसार, केरळ राज्यात आलेल्या आपत्तीमुळे जवळपास १९९६४ कोटी ६८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केरळ येथील आपत्तीला केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

पुढे बोलताना पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार प्रमुख मागण्या मांडल्या. केंद्र सरकारने केरळला दिलेली आर्थिक मदत कमी पडत असल्याने केरळ राज्याला पुरेशी आर्थिक मदत केंद्र सरकारने द्यावी, केरळ राज्यात पुरामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण झाली आहे त्यामुळे केरळला केंद्र सरकारने अन्नधान्यांचा मोफत पुरवठा करावा, केरळ राज्याला सावरण्यासाठी अनेक परराष्ट्र पुढे येत आहेत, त्यामुळे त्यांची मदत स्वीकारत केंद्र सरकारने केरळ सावरण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच आपत्तीग्रस्त राज्यांना नुकसानभरपाई देण्याची मापकं सहा ते सात वर्षांपूर्वी तयार केलेली असल्याने ती आत्ताच्या परिस्थितीत लागू होतीलच असे नाही, त्यामुळे केंद्र सरकारने या मापकांची पुनर्बांधणी करावी व ती केरळच्या बाबतीत लागू करावीत, अशी मागणी पवार यांनी केली. आखाती देशांकडून केंद्र सरकारने मदत नाकारली, याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, भारतियांनी, विशेषतः केरळवासियांनी आखाती देशांच्या विकासात मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आखाती देशांची मदत घेण्यास काहीच हरकत नाही. काही वर्षांपूर्वी अमेरिकेसारख्या देशानेही अशा एका परिस्थितीत भारताकडून मदत स्वीकारली होती. त्यामुळे भारताने अशी मदत स्वीकारण्यात काय गैर आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

संबंधित लेख