देशभरातील अटकसत्र भिडे, एकबोटेंवरून लक्ष वळवण्यासाठी – नवाब मलिक

31 Aug 2018 , 06:14:58 PM

एल्गार परिषदेचे आयोजन झाल्यामुळे भिमा-कोरेगावची घटना घडली असे भाजपचे लोक म्हणत असतील तर त्याचे निमंत्रक माजी न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील हे सुध्दा माओवादी आहेत का? प्रकाश आंबेडकर हे सुद्धा माओवादी आहेत का? असा सवाल करतानाच सरकारने जे अटकसत्र सुरु केले आहे हे एकबोटे, भिडे यांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यावरील लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केला.

माओवादी असल्याच्या आरोपाखाली देशभरात पाच लोकांना अटक करण्यात आली. यापूर्वीही चार लोकांना अटक करण्यात आली. हा कुठेतरी सरकारचा खेळखंडोबा आहे. ज्या दिवशी भिमा-कोरेगावची दंगल घडली, त्यानंतर महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आणि संपूर्ण देशाचे आणि मीडियाचे लक्ष लागल्यानंतर ही घटना मार्क्सवाद्यांनी घडवून आणली असे भाजपने बोलायला सुरुवात केली, असेही नवाब मलिक म्हणाले.

पंतप्रधानांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला असं सांगण्यात आले. हा कुठेतरी प्लॅन करुन सरकारने खेळखंडोबा सुरु केलेला आहे. देशभरात ठिकठिकाणी डॉ. दाभोळकर,कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचे अटकसत्र सुरु झाले. त्यांच्याकडे बॉम्ब, पिस्तुल मिळाले. याची देशभर चर्चा असताना त्यावरील लक्ष वळवण्यासाठी या पाच लोकांना अटक करण्याचे सत्र पुणे पोलिसांनी सुरु केले आहे. एकंदरीत हे मॉडेल पाहिले तर गुजरात मॉडेल महाराष्ट्रात लागू झालेले आहे का, अशी शंका नवाब मलिक यांनी व्यक्त केली.
सरकारने या पद्धतीने सगळे आंबेडकरवादी, मार्क्सवादी कार्यकर्ते हे शहरी नक्षली आहेत हा आरोप लावण्यास सुरुवात केली आहे, हे धोकादायक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या परिस्थितीला कधीही पुढे जाऊ देणार नाही. या सगळ्यांसोबत राष्ट्रवादी पक्षाचा लढा सुरूच राहणार आहे, अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली.

संबंधित लेख