पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा - जयंत पाटील

01 Sep 2018 , 12:04:33 AM

उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी कनेक्ट दौऱ्यावर असलेले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धुळे येथे पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात आणि मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर सर्वांत जास्त आहेत, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. रुपयाचे अवमूलन झाल्याने देशाची आर्थिक घडी बिघडली आहे. त्यामुळे सरकारला देश चालवता येत नाही, असा आरोप त्यांनी केला.

राज्यात अनेक प्रश्न आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, खड्ड्यांचा प्रश्न आहे, तेव्हा येत्या काळात या सर्वच प्रश्नांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे त्यांनी यावेळी सांगितले. येत्या काळात संपूर्ण राज्याचा दौरा करून पक्ष संघटना आणखी मजबूत करणार असल्याचेही ते म्हणाले. भाजपने दिल्लीतील पक्ष कार्यालयाची इमारत भव्य दिव्य बांधली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजपची स्वच्छ चारित्र्याचा पक्ष म्हणून ओळख होती पण आता ती ओळख पुसली गेली आहे. काही गोष्टींचा अतिरेक होत आहे. अतिरेक जास्त काळ टिकत नाही, हे आपण महाभारत काळापासून बघत आलोय. इंदिरा गांधी यांनीही आणीबाणी लावली आणि इंदिरा सरकारचा पराभव झाला होता. आताही कोणी अतिरेक करत असेल तर त्यांचाही पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. देशातील सर्वच राजकीय पक्षांची मागणी आहे की, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात. निवडणूक आयोगाने एकदा बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात. दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या. बॅलेट पेपरला फक्त भाजपचा विरोध असल्याने भाजप निवडणूक आयोग आणि इतर स्वतंत्र यंत्रणांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सिद्ध होते, असे जयंत पाटील म्हणाले.

परिवर्तनवादी विचारांच्या कार्यकर्त्यांना देशभरातून अटक केली जात आहे. या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न होत आहे. हत्येच्या, कटाच्या गप्पा कोणी मेलवर करते का? एक विशिष्ट संस्थेचे धागेदोरे दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येत सापडत आहेत. या मुद्द्याला बगल देण्यासाठी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. आमचा मुद्दा हा आहे की, देशात कोणीही अशांतता माजवण्याचा प्रयत्न करत असेल त्यावर कारवाई व्हायलाच हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. या मंत्र्यांच्या चौकशा झाल्या. मात्र ते अहवाल सरकारने सादर केले नाहीत. खडसे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बडतर्फ करण्यात आले, त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेले, पण इतर मंत्र्यांचे भ्रष्टाचार त्यापेक्षा मोठे आहेत त्यावर सरकार काहीच बोलत नाही, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

संबंधित लेख