सरकारला खरंच गरीब जनतेबाबत भान असेल तर सिलिंडरचे दर ४०० वर आणावे - जयंत पाटील

04 Sep 2018 , 06:36:21 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी Connect दौऱ्यांतर्गत नंदुरबार येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा कार्यकर्ता मेळावा घेतला. या दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच सरकारवर टीकेची झोडही उठवली.
विचारांवर आधारित कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी आपल्याला बुथ कमिट्या स्थापन करायच्या आहेत. आतापर्यंत २६ हजार बुथ कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेले आहेत. या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आपल्याला या जिल्ह्यात आणखी ताकद वाढवायला हवी, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला अनेक स्वप्ने दाखवली. मोदी देशाचा विकास करतील म्हणून भाजपचा हिंदुत्ववादी मुखवटा बाजूला ठेवून लोकांनी विकासासाठी नरेंद्र मोदी यांना निवडले. पण मोदी यांनी देशासाठी काहीच केले नाही. देशातील परिस्थिती फार बिकट आहे. देशातील गोरगरीब जनतेचा अपमान या सरकारने केला, अशी टीका त्यांनी केली. युपीए सरकारने गॅस सिलिंडरसाठी सबसिडी ठेवली होती. तेव्हा सिलिंडरची कि़ंमत ४०० रुपये होती आता ती कि़ंमत ८५० पर्यंत पोहोचली आहे. परवडत नाही म्हणून सिलिंडर बाहेर ठेवण्याचे काम ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोक करत आहेत. सरकारला जर खरंच गरीब जनतेबाबत भान असेल तर त्यांनी पुन्हा सिलिंडरचे दर ४०० वर आणावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आली तर सिलिंडर ४०० रुपयांपर्यंत आणण्याची व्यवस्था आपल्या सरकारला करावी लागेल आणि आम्ही ते करू, असे आश्वासनच त्यांनी यावेळी दिले
.
रुपयाचे अवमूलन होणे ही फार गंभीर बाब आहे. रुपया ७१ पर्यंत पोहोचला आहे. रुपयाचा भाव कमी होत आहे याचा तुमच्या दैनंदिन खर्चावर फरक पडणार, असा इशारा त्यांनी दिला. नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, नोटाबंदी चुकीची ठरली तर मला कोणत्याही चौकात फाशी द्या. आरबीआयने ९९.३० टक्के नोटा परत आल्या अशी घोषणा केली. याचा अर्थ सरकारला काळे धन सापडलेच नाही. या नोटा मोजण्यासाठी सरकारला २२ महिने लागले त्यामुळे ९९.३० टक्के हा आकडाही खोटा असल्याची शंका आहे. १०० टक्के पेक्षा जास्त नोटा परत आल्या असाव्यात, सरकारची नाचक्की होऊ नये म्हणून ९९.३० टक्के हा आकडा पुढे केला जात आहे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

या सरकारने नंदुरबार जिल्ह्यात एकही योजना आणली नाही. हीच परिस्थिती सर्व राज्यात आहे. आदिवासी मंत्री तर चार वर्षांत एकदाही या जिल्ह्यात फिरकले नाहीत. आघाडी सरकार असताना अजित पवार, मी आणि आमच्या इतर सहकाऱ्यांनी या भागासाठी भरघोस निधी दिला. इथल्या विकासकामांसाठी कधीही निधी अडवून ठेवला नाही, याची आठवण जयंत पाटील यांनी यावेळी करून दिली. नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासने दिली मात्र त्याची पूर्तता त्यांना करता आली नाही. देशातील जनता आता नरेंद्र मोदी यांना पर्याय शोधत आहे, असे ते म्हणाले. देशात पत्रकारांवर अंकुश ठेवला जात आहे. जो कोणी मोदी व त्यांच्या सरकारविरोधात लिहितो त्यांना घरी बसवण्याचे काम केले जात आहे. हे लोकशाहीसाठी मारक आहे. आमच्या विरोधात कोणीही बोलू नये अशी सध्याच्या सत्ताधाऱ्यांची भावना बनली आहे, अशी टीका त्यांनी केली. या सर्व गोष्टींचा सामना आपल्याला करायचा आहे म्हणून आपली ताकद वाढवायला हवी असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हीच राष्ट्रवादीची ताकद आहे, असे वक्तव्य केले. राष्ट्रवादी आपल्या कार्यकर्त्यांना कधीच सोडणार नाही. आम्ही राष्ट्रवादी पुढे आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊ आणि सर्वत्र राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू, असा विश्वास व्यक्त केला. या सरकारने सर्वत्र घाण करून सोडली आहे. आदिवासी समाजासाठी यांनी एकही नवीन योजना बनवली नाही. कोणत्याही समाजासाठी हे काम करत नाहीत. या सरकारला घरी बसवण्यासाठी आता राष्ट्रवादी कंबर कसेल, असे आवाहन त्यांनी केले.

माजी आमदार शरद गावित म्हणाले की, अपने वो नही होते जो तस्वीर मे होते है, अपने वो होते है जो तकलीफ मे साथ देते है असे वक्तव्य केले. हा भाग आदिवासी भाग आहे मात्र आदिवासी मंत्री विष्णू सावरा या जिल्ह्यासाठी काहीच करताना दिसत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. इथे पूर आला तेव्हा आठ दिवसांनंतर पालकमंत्री इथे आले होते. गावित साहेब आदिवासी मंत्री होते तेव्हा इथे योजनांची ढगफुटी व्हायची. योजनांचा पाऊस पडायचा. आता तशी परिस्थिती राहिली नाही, याची त्यांनी आठवण केली. काही जण आमच्याबाबत संभ्रम निर्माण करतात मात्र आमची छाती फाडली तरी त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळच दिसणार याची ग्वाही त्यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक उमेश पाटील यांनी या जिल्ह्यातील मतदारांची श्रद्धा पवार साहेबांवर आहे असे सांगत या जिल्ह्यातील प्रत्येक माणूस हा पुरोगामी विचारांचा आहे. तो कधीही पवार साहेबांची साथ सोडणार नाही, असे म्हटले. अच्छे दिनचे वातावरण आता राहिले नाही. सिलेंडरकडे बघितलं तर कळतं की किती अच्छे दिन आहेत. पेट्रोल पंपावर गेलं की किती अच्छे दिन आले आहेत. दोन कोटी रोजगार देणार असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र सरकारने एकाही तरुणाला रोजगार दिला नाही. या सरकारने तरुणांचा भ्रमनिरास केला आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

या मेळाव्यास महिला अध्यक्ष हेमलता शितोडे, युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, जिल्हा सरचिटणीस अनिल भांबरे, नवापूर गटनेते नरेंद्र नगराळे, माजी बांधकाम सभापती जिल्हापरिषद एम एस गावित, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख